भाजपवाल्यांचे पुढे कसे होईल याची चिंता वाटते. पठ्ठे इतके डोळे मिटून भक्ती करतात की धडावरचे शीर जरी उद्या मोदी-शहांनी गायब केले तरी सोशल मीडियाची तकलादू तलवार घेऊन यांची धडे सुद्धा कथित शत्रूंशी लढत राहतील असे वाटायला लागले आहे. खोटं बोल पण रेटून बोल, हा वाक्प्रचार तर यांनी कधीच मागे सोडला आहे. खोटे बोलायचे पण ते खरे वाटेल या शिस्तीत बसवून बोलायचे हा नवा कार्यक्रम आता त्यांनी सुरू केला आहे. सरकार कोणाचेही असो काही घटना अमानुष घडतात त्यावेळी त्यांचा निषेध करीतच पुढे जायला हवे. मात्र, भाजपवाले मोठे बेरकी निघाले. एकाच घटनेचे दोन अर्थ काढण्याची त्यांच्या मेंदूत मोदींनी जणू एखादी चिप बसवली असे वागतात*.
दिल्ली सीमेवर सुरू असलेले आंदोलन यांना कधीच आवडले नाही. जे पुस्तकातून शेती आणि शेतकरी बघत वयात येऊन बौद्धिक घेऊन अकाली वृद्ध झालेत त्यांच्यापैकी बहुतांश लोक भाजपमध्ये संघटन मंत्री या पदावर जाऊन बसले आहेत. त्यांनी वेळोवेळी जी वैचारिक खिचडी शिजवली असेल त्याचे गपगुमान वाटप करायचे एवढेच काम पक्षातील बहुजनांना उरले आहे. त्यामुळे खिचडी तयार करणारे वेगळे आणि वाटप करण्यासाठी एका पायावर तयार असणारे वेगळे आहेत. ठरलंय ना, जो भाजप विरोधात बोलेल तो देशद्रोही मग त्यावर अधिक चर्चा नको, इतके पक्के लोक कुठून निर्माण होतात? लय, भुगा करतात हे डोक्याचा.
लखीमपूर खिरी या उत्तर प्रदेशातील गावात आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या थेट अंगावर गाडी घालून चिरडल्याच्या व्हिडीओ पाहिला की आजही अंगावर काटा येतो. प्राण कंठाशी यायला लागतो. पण तुम्ही भाजपच्या मुशीत तयार झालेले असाल तर ही सत्यघटना न वाटता एखाद्या सिनेमातील ते दृश्य वाटायला लागते. माहीत नाही दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सार्यांनी मेंदूला अशी कोणती कमांड देऊन टाकली आहे की काहीही घडले तरी त्यातून राजकारण नेमके यांना कळते. महाराष्ट्र सरकारने या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्यातली आघाडीही काही कमी नाही. हजार उंदीर खाऊन शाकाहार समजावून सांगणारे एकापेक्षा एक शहाणे तिन्ही सत्ताधारी पक्षात आहेत.
लक्ष विचलित करण्यात भाजपने डिप्लोमा केला असेल तर दोन्ही काँग्रेस त्यात आधीच आचार्य पद घेऊन बसलेली आहेत. दोघांनाही म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांना फुलटाईम राजकारण करायचे आहे. यात सामान्य माणसाचे मरण होत असते. सत्ता कुणाचीही असो त्याचे वाईट परिणाम केवळ सामान्य जनतेला भोगावे लागतात, हे नवे नाही. गेली ७५ वर्ष हेच आपल्या देशात घडत आहे. फरक एवढाच आहे की जनता पक्षातून फुटून निघाल्यावर ज्या भाजपचा जन्म झाला त्यात असणार्या लोकांचा वैचारिक बालतार काढून टाकला जातो. त्यामुळे इतर पक्षात बौद्धिक दृष्टीने एवढी लुळी पांगळी फौज कुठेच दिसत नाही. काही दिवसांनी कोणत्याच भाजप कार्यकर्ता वा पदाधिकारी यांच्या सोबत तुम्हाला चर्चाच करता येणार नाही अशी वेळ येणार आहे. हळूहळू मानवी रोबोट तयार करण्याचे नागपुरात नियोजन होत आहे.
महाराष्ट्र बंद कोणत्या विषयावर होता हे सुद्धा माहीत नसणारा मोठा कार्यकर्ता वर्ग जर बंद किती टक्के झाला यावर चर्चा करीत असेल तर समजून घ्या की बालतार गायब झालेला आहे. कोणत्याही अँगलने तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा ते तुमचा अँगल मोडतोड करून फेकून देतील अन् मुस्लिमांमुळे देश कसा खड्ड्यात जात असल्याचे सांगत बसतील. तो मुद्दा संपला की ३७० रद्द झाल्याने देशात कशी क्रांती आली नि देश आत्मनिर्भर झाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करतील. बेक्कार आहेत हे मानवी रोबोट. जेवढे शिकवले तेवढेच बोलतात. कशाचाही नफातोटा कशालाही लावतात. हळूहळू देशात जे या पोपटाच्या विरोधात वातावरण तयार होत आहे तेच यांना डागण्या देत आहे.