मुक्तपीठ

‘दिन’ साजरा करणार की ‘दीन’ ठरणार ?

- दिलीप तिवारी, जळगाव

जळगाव शहरातील महिलांच्या बदनामीचे एक षडयंत्र उध्वस्त झाले. अर्धवट माहितीवर वृत्तांकन व छायाचित्रण करणाऱ्या प्रत्येकाच्या थोबाडीत चपराक बसली. जळगाव शहरातील भल्याभल्या दैनिकाचे बातमीदार व संपादक यांच्या विषय आकलनाच्या आणि संपादकिय व्यवस्थापनाच्या मर्यादा उघड्या पडल्या.

अवघ्या तीन दिवसांवर महिला दिन आलेला आहे. काही माध्यमांना महिला दिनाच्या पुरवण्या करण्याचे भरते येईल. सध्या जाहिराती मिळणे ठप्प आहे. मग स्वस्तातल्या जाहिरातींचे पैकेज करून महिलांच्या कार्याचे गोडवे गाणारे २/४ लेख छापले जातील. कार्यालयांमध्ये बोलावून संवाद, गप्पा होतील. बुके देऊन फोटो काढले जातील. वटपौर्णिमेला काही महिला जशा वडाला धागा गुंडाळून येतात त्याप्रमाणे संपादकाभोवती सेलिब्रिटी महिला फिरून येतील. दुसऱ्या दिवशी दैनिकात आपला फोटो असेल अशी अपेक्षा काहींची असतेच. त्यांना याचे आकर्षण असेल.

प्रश्न आहे तो अशा बेगडी महिला दिनाचा. अवघ्या ४ दिवसांपूर्वी हीच माध्यमे जळगावमधील आशादीप वसतीगृहातील १७ महिलांविषयी खोट्यानाट्या प्रकरणाच्या बातम्या छापत होते. ‘मुलींना कपडे काढून नाचायला लावले’ अशा ७२ पॉइंट अक्षरांचे शिर्षक देत होते. तेव्हा कोणत्या दैनिकाने किंवा माध्यमाने समाज मनाचा कानोसा घेऊन इतर महिलांना अभिव्यक्त व्हायला भाग पाडले ? कोणता पत्रकार व संपादक सत्य शोधायचा प्रयत्न करताना दिसला ? याची उत्तरे नकारार्थी आहेत. ‘बन चूके’ असलेली ही माणसे स्वतः कॉल करून इतरांकडून माहिती घेण्यातही कमीपणा समजतात. शहरातील इतर ४ महिलांशी मोकळेपणाने बोलणे तर दूरच.

महिला दिनी आता अशा संपादकांना जळगावमधील महिलांच्या गुण गौरवाचा पुळका येईल. जे संपादक आशादीप वसतीगृहातील पीडित, अन्यायग्रस्त, गरजवंत १७ महिलांची अब्रू चव्हाट्यावर मांडत होते तेच संपादक महिला दिनाला मूठभर महिलांचा बेगडी वृत्तीने सत्कार करतील. लेख पाडतील. काही लेख पैसे चुकते करून पुरवणीच्या दरात असतील. पण माझा प्रश्न आहे तो अशा तोंडदेखल्या सापळ्यात अडकणाऱ्या महिलांना. माध्यमांमध्ये तुम्हाला बोलावले जाईल किंवा तुमचे लेख मागितले जातील तेव्हा संपादकाला प्रश्न विचारायचे धाडस दाखवा. ‘त्या १७ महिलांचा काय दोष होता ? तुम्ही त्यांच्या विषयी खोटेनाटे का छापले ? अशा अर्धवट वृत्तांकनामुळे जळगावातील महिलांची बदनामी झाली नाही का ?’ असे प्रश्न विचारण्याचे धाडस आणि माध्यमांच्या बेगडी महिला दिनात सहभागी न होण्याचा करारी बाणा जळगावमधल्या इतर महिलांनी आता दाखवायलाच हवा.

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनीही जळगावमधील महिलांची बदनामी झाली अशी भूमिका घेतली आहे. खडसे यांनी विरोधी पक्षाला ठोकून काढले आहे. पण हे झाले सोयीचे राजकारण. कारण खडसे यांनीही जळगावमधील महिलांच्या बदनामी प्रकरणात सन १९९२ मध्ये असाच आकांडतांडव केला होता.  जळगाव कैसेट म्हणून स्व. मधुकरराव चौधरी यांना दिलेल्या व्हिडिओ कैसेटचे सत्य आजपर्यंत खडसेंनीही समाजासमोर ‘कबूल’ केलेले नाही. तशी ‘जळगाव कैसेट’ कधीही अस्तित्वात नव्हतीच. एवढेच नव्हे तर गेले वर्षभर खडसे दावा करीत आहेत, ‘माझ्याकडे आंबट कृत्याची सीडी आहे.’ अशा प्रकरणातून खडसेंनी जळगावमधील महिलांचा गौरव केला आहे का ? जरा हा प्रश्न स्वतःलाच विचारा. महिलांविषयी बोलताना कोणी ‘आंबे’ हा विषय काढून विनोद करते. कोणी दारुला ‘महिलेचे’ नाव द्या म्हणते.  कोणी ‘हनी ट्रैप’ च्या बातम्या पसरवते. कोणी राजकीय  पक्षा आडून कुंटनखाना चालवते. अशा कृत्यांमधून जळगाव मधील महिलांच्या चारित्र्याचे झेंडे बहुधा चंद्रावर लागत असावेत ?

जळगाव शहरातील सर्वच क्षेत्रातील महिलांना विनंती आहे, कोणत्याही माध्यमात महिला दिनानिमित्त स्वतःचा लेख, मुलाखत छापायला नकार द्या. जाहिरात तर मुळीच देऊ नका. *जेव्हा एखादा पत्रकार असे काही करायचे सूचवेल तेव्हा त्याला प्रश्न विचारा, ‘बाबारे त्या १७ महिलांची बदनामी केल्याबद्दल माफी कधी मागणार ?’ हा प्रश्न विचारून महिलांनी ‘दिन’ साजरा करायचे नाकारले तर पुढील काळात इतर महिलांना ‘दीन’ करण्याचे धाडस कोणतेही माध्यम करणार नाही. एकदा ठरवून तर पाहा …*

अभिमानी असणाऱ्या प्रत्येक महिलेला महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button