बीड : मुसळधार पावसाचा फटका बसून नुकसान झालेल्या परळी तालुक्यातील गावांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भरपावसात दौरा केला. गावांत जाऊन नुकसानीची पाहणी करत संकटात सापडलेल्या ग्रामस्थ, शेतकऱ्यांना त्यांनी धीर झाला. नुकसान झालेल्यांना शासनामार्फत मदत मिळवून देण्याचा शब्द देत पिकांबरोबरच शेतजमिनीच्या नुकसानीचीही विशेष भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तर, गुरवारच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं. पालकमंत्री पूरग्रस्त जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला गेले आहेत, असे म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसेच, राज्य सरकारने दरवेळी केंद्राकडे बोट दाखवणे योग्य नाही. राज्य सरकार हे पालक आहे. तर, केंद्र सरकार ग्रँड पॅरेंन्टस, त्यामुळे ते त्यांची जबाबदारी ओळखतात. पण, पालकांनी त्यांची जबाबदारी पूर्ण करायला हवी, असे पंकजा यांनी म्हटले.
गुलाब चक्रीवादळाचा तडाखा मराठवाड्याला बसला असून बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. बीडमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या पावासाने झालं असून अनेक शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. या शेतकऱ्यांना मदती दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय. मात्र, अद्यापही मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यावरुन, पंकजा मुंडेंनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी करताना, मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या मोठया संकटात आहेत. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे त्यांना विमा मिळत नाही. जलसंपदा मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री हे राजकीय कामासाठी जिल्ह्यात येऊन गेले. पण मंत्र्यांनी राजकीय दौरे करतांना इथल्या शेतकऱ्यांचाही विचार करणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही अशी खंत भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
जोरदार पावसामुळे परळी तालुक्यातील पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यांना मदत तर मिळालीच पाहिजे पण त्याचबरोबर जमिनीची माती देखील वाहून गेली आहे, त्याचीही विशेष नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे. शेतकऱ्यांनी अस्मानी संकटाचा धैर्याने सामना करावा पण आता त्यांचेवर सुलतानी संकट येऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी आणि वेळीच मदत द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली