
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपचे आ. नितेश राणे अजूनही बेपत्ता आहे. जामीन अर्जासाठी नितेश राणेंनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी आहे. पण, त्यांना त्यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच लपवून ठेवलं आहे, असा आरोप शिवसेनेचे आ. वैभव नाईक यांनी केला आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणात कणकवली जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. पण अजूनही नितेश राणे यांच्या कोणताही ठावठिकाणा लागला नाही. वैभव नाईक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नितेश राणे यांनी आता हजर व्हायला पाहिजे. नितेश राणे कुठे आहेत हे त्यांच्या कुटुंबीयांना माहीत आहे. त्यांचे दररोज बोलणंही होतंय. वडील केंद्रीय मंत्री असल्यामुळे आरोपीला लपण्यासाठी मदत होतेय. नारायण राणे यांनीच नितेश राणे यांना लपवून ठेवलं आहे, असा आरोपच नाईक यांनी केला.
प्रमोद वायगणकर सुखरूप घरी आले आहे. याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. ते आल्यानंतर त्यांनी कुणाचं नाव घेतलं हे सर्वांना माहीत आहे.. ते गायब झाल्यामुळे सतीश सावंत यांचा ईश्वर चिठ्ठीमध्ये पराभव झाला. ते असते तर सतिश सावंत जिंकलो असते. प्रमोद वायगणकर नसल्याने आमचा पराभव झाला. ते कुणामुळे बेपत्ता हे त्यांनी आधीच सांगितले आहे. त्यांच्या बेपत्ता होण्यामागे कोण होते हे सर्वांना माहीत आहे. ते बेपत्ता झाल्याने आमच्या हातून जिल्हा बँक गेली, असंही नाईक म्हणाले.
आता नितेश राणे यांनी अटकेला समोर यायला हवे. पोलीस प्रयत्न करत आहेत पण केंद्रीय मंत्री त्यांचे वडील आहेत.केंद्रीय मंत्र्यांच्या घरी लपवून ठेवले असेल अशी माझी शक्यता आहे, खुद्द नारायण राणे म्हणत आहेत मला माहित आहे, असंही नाईक म्हणाले.
येणाऱ्या काळात आम्ही निवडणूक जिंकू. राजन तेली हे पुन्हा राजकारणात येतील. आदित्य ठाकरे यांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. कोणावर जबाबदारी द्यायची हे पक्ष नेतृत्व ठरतील. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही ईश्वर चिठ्ठीतून जिंकली आहे. बँक त्यांच्या हातात होती पण आम्ही तिथं पर्यंत पोहोचलो. या निवडणुकीत पैशाचा वापर मोठा झाला होता, असा आरोपही नाईक यांनी केला.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर : केसरकर
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा नेते नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये थेट लढत रंगल्याचे पहायाला मिळाले. नारायण राणे आणि शिवसेना आमने-सामने आल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र या निवडणुकीत नारायण राणे यांनी बाजी मारली. आता यावरून शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणे आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत जरी नारायण राणे यांचा विजय झाला असला तरी, उमेदवारांचे एकूण मतदान बघितले तर त्यात भाजप पिछाडीवर असल्याचे दिसून येते. यावरून जिल्ह्यातील मतदान नारायण राणे यांच्या बाजूने नसल्याचे स्पष्ट होते, अशी टीका केसरकर यांनी केली आहे. केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, या निवडणुकांमध्ये सहा उमेदवार असे असतात की ज्यांना सर्व सभासद मतदान करत असतात. हे मतदान जिल्ह्यातील जनता कुणाच्या बाजुने असते याचे रिफ्लेक्शन असते. नारायण राणे हरत असल्याचे जेव्हा भाजपच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी आ. रवींद्र चव्हाण यांना पाठवले. चव्हाण यांनी कशाची जादू केली हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. आतापर्यंत माझा लढा हा दहशतवाद्यांविरोधात होता. आता निवडणुकीमध्ये पैशांचे वाटप करणाऱ्यांविरोधात असेल, असे म्हणत केसरकर यांनी या निवडणुकीमध्ये पैशांचे वाटप झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप देखील केला आहे.



