राधेश्याम मोपलवार यांना ‘एमएसआरडीसी’मध्ये पाचव्यांदा मुदतवाढ
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विकास महामंडळाचे (‘एमएसआरडीसी’) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर नेमणूकीवर पुन्हा एकदा राधेश्याम मोपलवार यांना मुदतवाढ मिळाली आहे. राधेश्याम मोपलवार यांना सेवा निवृत्तीनंतर पाचव्यांदा मिळालेली ही मुदतवाढ आहे. आगामी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. समृद्धी महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्यातील कामासाठी ही पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली असून त्यांचा कार्यकाळ आता ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत असेल. ठाकरे सरकारच्या काळात मोपलवार यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. राधेश्याम मोपलवार हे १९९५ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. फडणवीस आणि ठाकरे सरकारमध्ये सलग पाचवेळा विक्रमी मुदतवाढ मिळालेले मोपलवार हे पहिलेच अधिकारी असावेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार यांच्या सहीने मोपलवार यांच्या मुदतवाढीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. मुंबई- नागपूरला जलदगतीने जोडणाऱ्या हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने मोपलवार यांना करार पद्धतीने पुढील सहा महिन्यासाठी म्हणजे ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे निर्णयात म्हटले आहे.
राधेश्याम मोपलवार हे २८ फेब्रुवारी २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावरून निवृत्त झाले होते. त्यानंतर एका वर्षाच्या कालावधीसाठी त्यांना करार पद्धतीने पुन्हा एमएसआरडीसीमध्ये नियुक्त करण्यात आले. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०१९ नव्ये त्यांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ मिळाली. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०२० न्वये पुन्हा तीन महिन्यांसाठी शासन आदेश देण्यात आला. त्यानंतर २८ मे २०२० न्वये एक वर्षांसाठी ३१ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली. एमएसआरडीसीचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोपलवार यांना मुदतवाढ मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले. तर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेला पहिला प्रकल्प येत्या दिवाळी अखेर पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी दरम्यान पूर्ण होणार आहे. त्यामुळेच मोपलवार यांना मुदतवाढीचा हिरवा सिग्नल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असल्यानेच हा प्रकल्प पूर्ण करण्याची बाब विचारात घेऊन राधेश्याम मोपलवार यांच्या सहा महिन्यांच्या करार पद्धतीने नियुक्तीसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. राधेश्याम मोपलवार हे फिल्डचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. कामाच्या ठिकाणी अतिशय दबंग स्टाईलमध्ये काम करण्यासाठी राधेश्याम मोपलवार यांची ओळख आहे.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील महत्वाच्या कामाच्या दृष्टीने मोपलवार यांना मुदतवाढ मिळाली खरी. पण दुसरीकडे मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर ए राजीव यांना मात्र तीन महिन्यांच्या एका मुदतवाढीनंतर नव्याने मुदतवाढ देण्यात आली नाही. त्यामुळे एमएमआरडीएसारख्या संस्थेत अनेक प्रकल्प महत्वाच्या टप्प्यात असताना राजीव यांना न देण्यात आलेल्या मुदतवाढीमुळे चर्चेला उधाण आले आहे.