Top Newsराजकारण

मुंडे भगिनी समर्थकांच्या नाराजीचे लोण अहमदनगरपर्यंत !

पाथर्डी पंचायत समितीच्या सभापतींचा राजीनामा

अहमदनगर : भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याच्या भावनेतून निर्माण झालेल्या नाराजीचे लोण आता अहमदनगरपर्यंत पोहोचले आहे. मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यामान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. सुनीता दौंड यांच्यासोबतच त्यांचे पती गोळुळ दौंड यांनीसुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

केंद्रीय पातळीवर मुंडे भगिनींना डावलल्याच्या भानवेतून त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या प्रचंड नाराजी आहे. याच नाराजीच्या भावनेतून सध्या बीडधील पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. राजीनाम्याचे हे लोण आता थेट अहमदनगर जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे. जिल्ह्यातील पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यमान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. दौंड यांच्या राजीनाम्याबरोबरच त्यांचे पती गोकुळ दौंड यांनीसुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. या दोघांनीही आपले राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सोपवले आहेत. दोघांनीही सोबतच राजीनामे दिल्यामुळे जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

बीडमध्ये सर्व ११ तालुकाध्यक्षांचा राजीनामा

मोदी सरकार म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना स्थान मिळाले. मात्र, खासदार प्रितम मुंडे यांना कोणतेही मंत्रिपद दिले गेले नाही. याच कारणामुळे बीडमधील भाजप पदाधिकारी नाराज असून जिल्ह्यातील सर्वच भाजप तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. यामध्ये परळीसह एकूण ११ तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने हे पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. या ११ तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर ही संख्या आता २५ वर पोहोचली आहे.

याआधी १४ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यानंतर मुंडे यांनी मी नाराज नसल्याचे माध्यमांसमोर सांगितले. पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम मिळेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र याच क्षणी बीडमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. बीड जिल्ह्यातील मुंडे भगिनींचे समर्थक असलेले भाजप पदाधिकारी प्रचंड नाराज असल्याचे समोर येत आहे. ११ तालुकाध्यक्षांनी राजीनामा देण्यापूर्वी येथे एकूण १४ भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांचासुद्धा समावेश आहे.

राजीनामे देणारे कार्यकर्ते भाजप निष्ठावान नाहीत : गणेश हाके

भाजप नेत्यांनी आता या राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केलीय. भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्यानं राजीनामे देणारे भाजपचे एकनिष्ठ नसल्याचा आरोप केलाय. त्यामुळे हा वाद आणखीच पेटणार असल्याचं दिसतंय.

भाजप नेते गणेश हाके म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाची जी पुनर्रचना झालीय त्यात प्रीतम मुंडे यांचा समावेश झाला नाही. त्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचं मी ऐकलंय. परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि अंतिमतः आपण असतो. हीच भारतीय जनता पक्षाची विचारसरणी आहे.

भाजपचे जे पक्षांतर्गत निर्णय होतात ते पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून होतात. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात ज्या मंत्र्यांचा समावेश झालाय तो पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून झालाय. अशावेळी व्यक्तीला महत्त्व न देता पक्षाला महत्त्व द्यायला हवा. पक्षाने घेतलेला निर्णय योग्य आणि पक्ष हिताचा आहे असंच भाजपचे निष्ठावान समजतात. त्यामुळे राजीनामे देणार पदाधिकारी भाजपचे निष्ठावान नाहीत असं मला वाटतं. केवळ प्रीतम मुंडे यांना पद दिलं नाही म्हणून राजीनामे देणं योग्य नाही, असं हाके यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button