मालवाहतुकदारांसाठीची जाचक नियमावली रद्द करा :नाना पटोले
मुंबई : कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. मागील दोन वर्षांपासून नागरिक कोरोनामुळे त्रस्त झाले आहेत. उद्योग व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे. त्यात आता केंद्रीय परिवहन मंत्रालयाने मालवाहतुकीसंदर्भात जाहीर केलेली नियमावली जाचक ठरत असून ही अन्यायपूर्ण नियमावली महाराष्ट्र सरकारने रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या परिवहन मंत्रालयाने जारी केलेली नियमावली महाराष्ट्रातही लागू केली आहे. या नियमावलीने शेतकरी, मालवाहतुकदार यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ट्रक, टेम्पो, पिकअप यासारख्या मालवाहतुक गाड्यांमध्ये प्रमाणापेक्षा एक किलो माल जरी जास्त झाला तरी ओव्हरलोडच्या नियमाखाली किमान ६८ हजार रुपये दंड आकारला जातो. यातून मोठा आर्थिक फटका बसत आहे. या प्रकरणी लक्ष घालून महाराष्ट्रात हे जाचक नियम रद्द करून दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या परिवहन विभागाचे अध्यक्ष सूरज चिंचोले यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे याबाबत दाद मागितली असता त्याची दखल घेऊन पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलासा देण्याबाबत पत्र पाठविले आहे.