‘आरसीबी’च्या शिलेदाराची कोरोनावर मात

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) हंगामाला केवळ दोन दिवस शिल्लक आहेत, पण या लीगवरील कोरोनाचा धोका संपण्याचं नाव घेत नाही. चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्सनंतर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघालादेखील कोरोनाचा फटका बसला. आरसीबीचा स्टार युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे देवदत्तला उर्वरित संघापासून वेगळे करत आयसोलेट करण्यात आले होते. परंतु देवदत्तची नुकतीच एक कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तो पुन्हा एकदा संघात परतला आहे.
कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने देवदत्त चेन्नईमध्ये त्याच्या संघात सहभागी झाला आहे. त्याने आता सरावदेखील सुरु केला आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीच्या चिंता काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. ही बातमी आरसीबीसाठी महत्त्वाची आहे, कारण देवदत्त पडिक्कल आता मुंबईविरुद्धचा पहिला सामना खेळू शकेल, अशा आशा निर्माण झाल्या आहेत.
आयपीएलच्या मागील सीझनमध्ये आरसीबीसाठी सर्वाद जास्त धावा करणारा देवदत्त पडिक्कल बुधवारी चेन्नईमध्ये त्याच्या संघाच्या बायो बबलमध्ये परतला आहे. संघाने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार आरसीबीने म्हटलं आहे की, “बीसीसीआयच्या नियमांनुसार कोविड -19 चा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डावखुरा फलंदाज देवदत्त पादक्कल 7 एप्रिल 2021 रोजी संघात सामील झाला आहे. याचा आम्हाला आनंद झाला. आरसीबीचं वैद्यकीय पथक खेळाडूंची सुरक्षितता आणि आरोग्याची काळजी घेत आहे.
आरसीबीचा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना 9 एप्रिल रोजी चेन्नईत खेळवला जाणार आहे. पण देवदत्तचे या सामन्यात खेळणे कठीण झाले होते. आयपीएलच्या गेल्या हंगामात देवदत्त आरसीबीसाठी एक मोठा स्टार खेळाडू म्हणून समोर आला होता. टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना त्याने चमकदार कामगिरी केली होती. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात देवदत्तचा मोठा वाटा होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याननंतर संघासमोर अडचण निर्माण झाली होती. परंतु आता तो संघात परतल्याने संघाचं बळ वाढलं आहे.
आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून सर्वात जास्त धावा देवदत्तने फटकावल्या होत्या. त्याने या बाबतीत कर्णधार विराट कोहली आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सलादेखील मागे ठेवले होते. IPL 2020 मध्ये पडीक्कलला 15 सामन्यांमध्ये आरसीबी संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या 15 सामन्यांमध्ये त्याने 31.53 च्या सरासरीने आणि 124 च्या स्ट्राईक रेटने आणि 5 अर्धशतकांच्या तब्बल 473 धावा फटकावल्या होत्या.
देवदत्तने विजय हजारे करंडक स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात पृथ्वी शॉनंतर सर्वाधिक धावा चोपल्या. 20 वर्षीय देवदत्तने 7 सामन्यात 147. 4 च्या सरासरीने 737 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली. विशेष म्हणजे देवदत्तने 4 शतकं सलग 4 सामन्यात लगावली. यासह देवदत्तने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटने 2008 मध्ये हजारे करंडकात असाच कारनामा केला होता.