भारताच्या मेरी कोमचा धक्कादायक पराभव

टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत आजचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पी व्ही सिंधून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय पुरुष हॉकी संघानं अ गटातील सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनावर ३-१ असा दणदणीत विजय मिळवला, तिरंदाजीत अतनू दासनं दोन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला हार मानण्यास भाग पाडले. मात्र लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या मेरीला पराभवाचा धक्का बसला.
महिलांच्या ४८-५१ किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मेरीसमोर कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना व्हिक्टोरियाचे आव्हान होते. इंग्रीटनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपद नावावर केले आहे. पहिल्या फेरीत इंग्रीटनं आक्रमक खेळ करताना ४-१ अशी बाजी मारली. मेरीनं डिफेन्सिव्ह खेळावरच भर दिला. दुसऱ्या फेरीत मेरीकडून पलटवार झाला. जबरदस्त पदलालीत्य अन् जोरदार ठोसे मारून मेरीनं प्रतिस्पर्धीला बॅकफूटवर पाठवले. मेरीनं या फेरीत ३-२ अशी बाजी मारली. तिसऱ्या फेरीत कडवी टक्कर झाली. मात्र, इंग्रिटानं तिसऱ्या राऊंडमध्ये पुनरागमन केल्यानं मेरिकोमचा पराभव झाला. मेरिकोमचा २-३ असा पराभव झाला.
मेरी कोमनं सहावेळा जागतिक स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. पदकाची दावेदार मानली जाणारी मेरीकोम चार मुलांची आई आहे. त्यातील दोन मुले जुळी. एका मुलाला २०१३ ला जन्म दिला. २०१८ ला मेरी कोमने मुलगी दत्तक घेतली.