अहमदाबाद : गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यानंतर फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे इंग्लंडने पहिल्या टी-२० सामन्यात भारतावरवर ८ गाडी राखून विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताला २० षटकांत ७ बाद १२४ धावाच करता आल्या. लोकेश राहुल (१), कर्णधार विराट कोहली (०) आणि शिखर धवन (४) हे झटपट माघारी परतले. यानंतर श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरत ४८ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६७ धावांची खेळी केली. पंतने २१ रन्स केल्या. पंत आणि अय्यर या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने १२४ धावांपर्यंत मजल मारली. यामुळे इंग्लंडला विजयासाठी १२५ धावांचे माफक आव्हान मिळाले. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
१२५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉस बटलर यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. या दोघांनी ८ षटकांत ७२ धावांची सलामी दिल्यावर बटलरला (२८) युजवेंद्र चहलने पायचीत पकडले. तर रॉयचे अर्धशतक एका धावेने हुकले. ३२ चेंडूत ४९ धावा केल्यावर त्याला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. यानंतर मात्र डाविड मलान (नाबाद २४) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद २६) यांनी चांगली फलंदाजी करत इंग्लंडला १६ व्या षटकात विजय मिळवून दिला. टीम इंडियाकडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
युझवेंद्र चहलची विक्रमाला गवसणी
टीम इंडियाकडून युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. चहलने या एकमेव विकेटसह विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहचा (jasprit bumrah) रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
युजवेंद्र चहल टीम इंडियाकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने बुमराहला पछाडत ही कामगिरी केली आहे. चहलने इंग्लंडच्या जॉस बटलरला आऊट करत ही कामगिरी केली. बटलरची ही विकेट चहलच्या टी 20 कारकिर्दीतील 60 वी विकेट ठरली. चहलने 46 व्या टी 20 सामन्यामध्ये ही कामगिरी केली. इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिला टी 20 सामना चहलच्या कारकिर्दीतील 100 वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. चहल आतापर्यंत टीम इंडियाकडून 46 टी 20 आणि 54 एकदिवसीय सामन्यात खेळला आहे.