स्पोर्ट्स

‘आयपीएल २०२१’चा दुसरा टप्पा १७ सप्टेंबरपासून सुरु होणार !

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल २०२१चे १४वे सत्र आता यूएईमध्ये पूर्ण होईल. बायो बबलमध्ये कोरोनाच्या प्रवेशानंतर २९ सामन्यांनंतरच लीग पुढे ढकलण्यात आली. नुकतीच बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली. परंतु, तारखेसंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. पण खात्रीलायक वृत्तानुसार, आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा १७ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना १० ऑक्टोबरला खेळला जाईल.

बीसीसीआयने कॅरेबियन प्रीमियर लीगमुळे (सीपीएल २०२१) आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले नाही. सीपीएल २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान खेळला जाईल. या कारणास्तव, ही लीग ७ ते १० दिवस अगोदर आयोजित करण्यासाठी वेस्ट इंडीज बोर्डाशी चर्चा केली जात आहे, जेणेकरून त्या लीगमध्ये खेळणारे आयपीएलचे ते खेळाडू यूएईत पोहोचू शकतील.

बीसीसीआय येत्या १० दिवसात आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करेल. बीसीसीआय अजूनही इंग्लिश खेळाडूंशी त्यांच्या आयपीएलमध्ये खेळण्याविषयी चर्चा करत आहे. मात्र, इंग्लंड बोर्डाने आधीच सांगितले आहे, की ते आपल्या खेळाडूंना आयपीएलसाठी सोडणार नाही.

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएलच्या उर्वरित हंगामात न खेळण्याचे म्हटले आहे. सध्याच्या मोसमात कोलकाता संघाला चांगली कामगिरी करता आली नसल्यामुळे हा संघाला दुहेरी धक्का मानला जाऊ शकतो. संघाने यंदा ७ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत. कोलकाता पॉइंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button