
दुबई : आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशांना मोठा धक्का बसला. दिल्ली कॅपिटल्सनं १३० धावांचे लक्ष्य अखेरच्या षटकात पार करून ४ विकेट्स राखून विजय मिळवला. अखेरच्या षटकात विजयासाठी ४ धावांची गरज असताना कृणाल पांड्यानं टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर अश्विननं खणखणीत षटकार खेचून दिल्लीचा विजय पक्का केला. दिल्लीनं १८ गुणांसह दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली आहे, परंतु मुंबईचे १२ सामन्यानंतर १० गुण झाले आहेत. त्यांना उर्वरित दोन सामने जिंकावे तर लागतीलच, शिवाय अन्य संघाच्या कामगिरीवरही अवलंबून रहावे लागेल.
मुंबई इंडियन्सच्या तगड्या फलंदाजांची आज दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांसमोर दैना उडाली. अक्षर पटेल व आवेश खान यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत मुंबईला १२९ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. रोहित शर्मा (७), क्विंटन डी कॉक (१९), सौरभ तिवारी (१५), किरॉन पोलार्ड (६) हे अपयशी ठरले. सूर्यकुमारला आज मोठी खेळी करून टीकाकारांची तोंड बंद करण्याची संधी होती. त्यानं काही सुरेख फटके मारून त्या दिशेनं सुरुवातही केली, परंतु अक्षरच्या फुल्टॉसवर तो रबाडाच्या हाती झेल देऊन परतला. त्यानं २६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह ३३ धावा केल्या. १५ व्या षटकात किरॉन पोलार्ड दुर्दैवीरित्या बाद झाला. अॅनरिच नॉर्ट्झेनं टाकलेल्या संथ चेंडूवर पोलार्डची बॅट आधीच फिरकी अन् चेंडू बॅटची किनार घेत यष्टींवर आदळला. अक्षर पटेलनं ४ षटकांत २१ धावा देत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. कृणाल व हार्दिक ही पांड्या ब्रदर्स जोडीही काहीच कमाल करू शकली नाही. आवेश खानच्या अप्रतमि यॉर्कनं हार्दिकचा (१७) त्रिफळा उडवला. आवेश खाननं १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात दिल्लीचेही तीन फलंदाज झटपट माघारी परतले. शिखर धवनला (८) घाई नडली अन् किरॉन पोलार्डच्या भन्नाट थ्रोवर तो रन आऊट झाला. पृथ्वी शॉ (६) व स्टीव्ह स्मिथ (९) यांना अनुक्रमे कृणाल पांड्या व नॅथन कोल्टरनाईल यांनी बाद केले. दिल्लीचे ३ फलंदाज ३० धावांत माघारी परतले होते. रिषभ पंतनं झटपट २६ धावा केल्या, परंतु तो जयंत यादवला विकेट देऊन बसला. ट्रेंट बोल्टनं अक्षर पटेलला पायचीत करून दिल्लीचा पाचवा गडी माघारी पाठवला. जसप्रीत बुमराहच्या स्लोव्हर चेंडूवर शिमरोन हेटमायर (१५) सहज बाद झाला. १५ षटकांत मुंबईच्या ५ बाद ८७ धावा होत्या, तर दिल्लीनं ६ बाद १०० धावा केल्या.
श्रेयस अय्यर व आर अश्विन ही जोडी खेळपट्टीवर चिकटली आणि त्यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. खराब चेंडूवर मोठे फटके मारण्याची संधी या दोघांनीही सोडली नाही. त्यांनी अखेरच्या षटकात ४ धावा असा सामना फिरवला. अश्विननं २० व्या षटकातील पहिलाच चेंडू सीमापार पाठवला अन् ४ विकेट्स राखून विजय मिळवला. अय्यर ३३, तर अश्विन २० धावांवर नाबाद राहिला.