स्पोर्ट्स

पृथ्वी शॉची तुफानी फटकेबाजी; विराट, धोनीचा विक्रम मोडला

मुंबई : अ श्रेणी क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉनं दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. सौराष्ट्रच्या संघाविरोधात खेळत असताना विजय हजारे ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉनं नाबाद 185 धावा केल्या. दिल्लीतील पालम ए स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या उपउपांत्य फेरीमध्ये त्याची ही कामगिरी पाहायला मिळाली.

शॉच्या या शतकी खेळीच्या बळावर त्यानं क्रिकेटच्या या फॉर्ममधील सर्वाधिक धावांचा धोनी आणि विराट कोहलीचा विक्रम मोडला. 123 चेंडूंचा सामना करणाऱ्या शॉ नं 21 चौकार आणि 7 षटकार झळकवले. अ श्रेणीतील क्रिकेट प्रकारात अशी कामगिरी करणारा शॉ या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानं एम.एस. धोनीच्या 183 धावांच्या कामगिरीला मागे टाकलं आहे. धोनीच्या याच विक्रमाची बरोबरी 2012 मध्ये विराट कोहलीनं पाकिस्तानसोबतच्या सामन्यात केली होती.

दरम्यान, शॉ च्या या दमदार आणि आक्रमक खेळीमुळं सध्या सुरु असणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईनं सौराष्ट्रवर नऊ गडी राखत विजय मिळवला.
सौराष्ट्रच्या 5 बाद 284 धावांचा पाठलाग करताना पृथ्वीनं एका बाजूनं तुफान फटकेबाजी करत विरोधी संघाच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. अवघ्या 67 चेंडूंमध्ये त्यानं शतक पूर्ण केलं आणि फलंदाजीचं हे वादळ सौराष्ट्रच्या गोलंदाजांवर असंच घोंगावत राहिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button