तौक्ते चक्रीवादळाची गुजरातच्या दिशेने वाटचाल; किनारपट्टीला मोठा तडाखा
कोकण रेल्वेला फटका; एक्सप्रेस ट्रेनवर झाड कोसळल्यानं रेल्वेसेवा ठप्प
मुंबई : तौक्ते चक्रीवादळ भारताचा पश्चिम किनारपट्टी भागात घोंघावत आहे. या चक्रीवादळाने आता गुजरातच्या दिशेने वाटचाल सुरु केली असून वाटेत केरळ, कर्नाटक या भागांतही मोठी हानी केली आहे. केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वादळामुळे कर्नाटकमधील शेकडो गावांतील घरांचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यात २४ तासांत चौघांचा या वादळामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागातही धोक्याची इशारा देण्यात आला असून येत्या काही तासांमध्ये या वादळाची तीव्रता आणखी वाढत आहे. त्यामुळे १४५ किमी प्रति तास एवढ्या वेगाने वादळी वारे वाहतील, असा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत दाखल झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे आता राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे मस्जिदीवरील पत्रे उडून गेल्याची माहिती आता समोर येत आहे. शिवाय, आंबोळगड, साखरीनाटे, जैतापूर या गावांमधील काही घरांवरी पत्रे देखील उडून गेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित झाला असून नेटवर्कला देखील समस्या येत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांवरती झाडे देखील उन्मळून पडली आहेत.
गोव्यात कोविड सेंटरमध्ये पावसाचे पाणी
तौक्ते चक्रीवादळामुळं गोव्यात जोरदार वादळी वारं पाहायला मिळालं. तुफान पावसाचा फटकाही गोव्याला बसल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार असलेल्या कोविड सेंटरलाही याचा फटका बसला. गोव्याच्या बांबोलिम भागामध्ये असलेल्या कोविड सेंटरमध्ये पावसाचं पाणी घुसल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर काही वेळातच प्रशासनाचं पथक याठिकाणी दाखल झालं. त्यांनी त्वरित याठिकाणी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याठिकाणी मोठं काही नुकसान मात्र झालं नाही.
कोकण रेल्वेला फटका; एक्सप्रेस ट्रेनवर झाड कोसळल्यानं रेल्वेसेवा ठप्प
मागील काही दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. आता या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर भयानक चक्रीवादळात होतं आहे. याचा फटका गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसत आहे. काल कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पावसानं कहर केला आहे. तर बऱ्याच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. अरबी समुद्रातील वादळामुळे किनारपट्टीवर येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यानं कोकणातील एका रेल्वेवर झाड कोसळलं आहे. त्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. आज सकाळी नेत्रावती एक्सप्रेस ट्रेन मडगाववरून थिवीमकडे जात असताना या ट्रेनला अपघात झाला आहे. एक भलं मोठं ट्रेनवर कोसळल्यानं मध्येच ही ट्रेन थांबवावी लागली आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. सध्या लोहमार्गावर पडलेल्या या झाडाला हटवण्याच काम युद्धपातळीवर सुरू असून रेल्वेसेवा लवकरच सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेतील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
लोहमार्गावर झाड कोसळल्यानं कोकण रेल्वेविभागातील थिवीम ते मडगाव दरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम या मार्गावर प्रवास करणाऱ्या इतरही रेल्वेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील काही ट्रेन उशीरा धावू शकतात. सध्या कोकणातील वातावरण झपाट्यानं बदलत आहे. परिणामी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच अरबी समुद्रात सुरू असलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात गारवा निर्माण झाला आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे केरळ आणि कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यांवर अजस्त्र लाटांचा मारा सुरु आहे. केरळमधील थिरुवनंतपुरमपासून कासरगोडपर्यंत शेकडो घरांचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबांना घरे सोडून मदत शिबिरात हलवण्यात आले आहे. या वादळाच्या तडाख्यामुळे किनाऱ्याजवळील शेकडो नारळ, फोफळीची आणि इतर फळांची झाडे उन्मळून पडली असून विजेचे खांब कोसळले आहेत. किनारपट्टीला लागून असलेल्या गावांमध्ये धोका जास्त असून अनेक गावांमध्ये मोठ्या लाटांमुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे.
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी घेतला आढावा
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी तयारीचा आढावा घेतला. मोदींनी शनिवारी राज्येय, केंद्रीय मंत्रालय आणि आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याच्या सूचना केल्या. तसंच नागरिकांसाठी वीज, संपर्क यंत्रणा, पिण्याचे पाणी यासारख्या आवश्यक बाबींची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. दरम्यान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यांचा मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. यात महाराष्ट्र, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसह दमण-दीव आणि दादरा-नगर हवेलीतील तयारीचा आढावा घेतला जात आहे.