कोरोनाचा विस्फोट झाला असतानाच नाशिकमध्ये रेव्ह पार्टी; उच्चभ्रू तरुण-तरुणींना अटक
नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना गंगापूर धरणाला लागून असलेल्या एका फार्म हाऊसवर सुरू असलेली रेव्ह पार्टी (rave party) पोलिसांनी उधळून लावली. जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांनी स्वत: मध्यरात्री 2 वाजता केलेल्या या कारवाईत शहरातील हाय प्रोफाइल घरातील तरुण-तरुणींना अटक करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना नाशिकच्या गंगापूर धरणालगत असलेल्या एका खाजगी फार्म हाऊसवर शहरातील काही श्रीमंत घरातील मुलांची हाय-फ्रॉफाईल रेव्ह पार्टी सुरू होती. जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वत: या खाजगी फार्म हाऊसवर छापा टाकत ही पार्टी उधळून लावली. या पार्टीत एका मोठ्या डान्स हॉलमध्ये बिअर, वाईन आणि व्हिस्कीचे पेग रिचवत, हुक्याचे झुररें सोडत डान्स करत होते.
मात्र, पोलिसांना बघताच या धनदांडग्याच्या मुलांची पळापळ झाली. नाशिक शहरच नव्हे तर मुंबई पुण्यातीलही हायप्रोफाईल घरातील तरुण-तरुणी या रेव्ह पार्टीत सहभागी झाले होते. शनिवार रविवार विकेंडला अशा पार्ट्याचं आयोजन होत असल्याची पोलिसांना खबर होती. पोलिसांच्या कारवाईत प्रोफाइल घरातील तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
कोरोनामुळे जिल्ह्यात अनेक निर्बंध घालून दिले असताना शहराला लागून असलेल्या एका खाजगी फार्म हाऊसवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईत ‘बडे बाप की औलाद’ म्हणून मिरवणाऱ्या मुलांच्या महागड्या गाड्या देखील पोलिसांनी जप्त केल्या आहे. या पार्टीत नाचगाणे, दारू आणि हुक्क्या सोबत ड्रग्जचा देखील वापर झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मध्यरात्री दोन वाजता खाजगी फार्म हाऊसवर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी स्वत: टाकलेल्या छाप्यात मुबंई पुण्यासह नाशिकमधील हाय फ्रोफाईल घरातील तरुण तरुणींसह 30 ते 40 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांनी स्वत: ही कारवाई केल्याने या कारवाईनंतर सुरू झालेला राजकीय हस्तक्षेपही मवाळ झाला.