इतर

संजय पांडे नाराज; मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंगांवर गंभीर आरोप

मुंबई : सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे प्रकरणामुळे अडचणीत आल्याने बदली झालेले मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह होमगार्डमधून बदली झालेले ज्येष्ठ महासंचालक संजय पांडे हे ठाकरे सरकारवर नाराज आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच नाराजीनामा लिहीत आपल्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी केली आहे. ‘मी आजही पोलीस दलात असून माझ्या युनिफॉर्मचा तरी सन्मान करा , होमगार्डमधून मला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर पाठवून माझा अजून अपमान करू नका. मी कोणत्याही परिस्थितीत नवीन पदभार सांभाळणार नाही. मी सुट्टीवर जात आहे. गेल्या तीस वर्षात मला कायम साईडपोस्टींगच मिळाली आणि कायम माझ्यावर अन्यायच झाला. असे खरमरीत पत्र पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्याने पोलीस दलात नाराजीनाट्याचा नवा अंक सुरू झाला आहे. या पत्रात संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांच्यावरही ताशेरे ओढले आहेत. परमबीर सिंह यांचे काम व्यवस्थित नाही. त्यांनी आपल्याला एका प्रकरणाच्या तपासात सहकार्य न केल्याचेही संजय पांडे यांनी बोलून दाखवले आहे.

कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही. आतादेखील पोलीस महासंचालकपद किंवा मुंबई पोलीस आयुक्तपद रिक्त झाले असतानाही संधी देण्यात आली नाही. याउलट माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्याला ते पद देण्यात आले, अशी खंत संजय पांडे यांनी व्यक्त केली.

संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. पण असे असतानाही त्यांना डावलून गेल्यावर्षी परमबीर सिंह यांना मुंबईचे पोलीस आयुक्त बनवले होते. तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकपदीही माझ्यापेक्षा ज्यूनियर असलेले हेमंत नगराळे यांची नियुक्ती माझ्यावर अन्यायकारकच होती. तसेच तत्कालिन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या केंद्रातील बदली नंतरही माझ्या नावाचा विचार केला नाही असेही पत्रात म्हटले आहे. माझ्या पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात माझा सीआर रिपोर्ट कायम अतुलनीय राहिलेला आहे. असे असताना मला कायम साईडपोस्टींग का? होमगार्डमध्ये मी सलग पाच वर्ष काम केल्याने आता तरी माझ्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी पांडे यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करूनही माझी बदली योग्य ठिकाणी झाली नाही. तरी ठाकरे सरकारने मला योग्य ठिकाणी बढती द्यावी असे विनंतीवजा पत्रच पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. यावर ठाकरे सरकार पांडे यांना काय उत्तर देणार याकडे पोलीस दलाचे लक्ष लागून राहिले आहे.

दुसरीकडे पोलीस आयु्क्तपदावरून उचलबांगडी झालेले परमबीर सिंह यांनीही होमगार्डचा पदभार न सांभाळता सुट्टीच घेतली आहे. त्यामुळे आता संजय पांडेनंतरह परमबीर सिंह यांनीही पदभार घेतलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button