आरोग्य

देशातील कोरोनाची पहिली रुग्ण १८ महिन्यांनंतर पुन्हा ‘पॉझिटिव्ह’

नवी दिल्ली : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. मात्र असं असताना कोरोनासंदर्भातील नवनवीन माहिती समोर येत आहे. देशातील कोरोनाची पहिली रुग्ण पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ३० जानेवारी २०२० रोजी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या तरुणीला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशात कोरोनाची पहिली रुग्ण आढळून आलेली महिला ही केरळच्या थ्रिसूर जिल्ह्यातील आहे. जिल्हा वैद्यकिय अधिकारी डॉ. के. जे रिना यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा आरटी-पीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र तिच्यामध्ये सध्या कोणतीही लक्षणं नाहीत. ती भारतातील पहिली कोरोनाबाधित रुग्ण होती. त्यानंतर आता जवळपास १८ महिन्यांच्या कालावधीनंतर तिला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मुलीला काही कारणांसाठी दिल्लीला जायचं होतं. ज्यासाठी तिचे सॅम्पल घेण्यात आले होते. मात्र तेव्हा तिच्या टेस्टचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.

महिलेची प्रकृती सध्या ठिक असून ती घरीच असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या वर्षी ही महिला चीनच्या वुहान शहरात वैद्यकीय अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत होती. याच दरम्यान तिला कोरोनाची लागण झाली. ती आपल्या सुट्टीसाठी भारतात आली होती. त्यामुळेच ती देशातील कोरोनाची पहिली रुग्ण होती. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. जवळपास तीन आठवडे उपचार केल्यानंतर महिलेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर तिला २० फेब्रुवारी २०२० ला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.

देशात अद्यापही कोरोनाचा धोका कायम आहे. काही राज्यांमधील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच डेल्टा प्लससह अनेक व्हेरिएंटमुळे आणखी काळजी वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात दररोज जवळपास दर दीड मिनिटाला कोरोनामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत आहे. तसेच सध्या लोकांचा निष्काळजीपणा वाढलेला दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील दोन जास्त ही सर्वाधिक कोरोना प्रभावित आहेत. महाराष्ट्र आणि केरळमधील रुग्णांची संख्या ही सर्वात जास्त आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button