भारत आणि इंग्लंडमधील स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

हैदराबाद : देशात कोरोनाच्या लाटेत दररोज तीन लाखांच्या वर रुग्णांची नोंद होत आहे, तर मृतांचा आकडाही नकोसा विक्रम प्रस्थापित करत आहे. भारतात कोरोना फैलाव रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय मोठं हत्यार नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण करणं आवश्यक आहे. मात्र भारतात आढळून आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. कोणती लस नव्या स्ट्रेनवर प्रभावी यावरून प्रश्न विचारले जात होते. आता कोव्हॅक्सिन लस भारत आणि इंग्लंडमधील नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकनं केला आहे.
देशातील (B.1.617) आणि ब्रिटनमधील (B.1.1.7) या स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन प्रभावीपणे मात करत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. कंपनीने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि भारतीय विज्ञान संशोधन विभाग यांच्या माध्यमातून या स्ट्रेनवर सखोल अभ्यास केला. त्यानंतर भारत बायोटेकच्या सह संस्थापक सुचित्रा इला यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी हे ट्विट पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना टॅग केलं आहे.
https://twitter.com/SuchitraElla/status/1393644129641320449
देशात सध्या तीन लसींचं लसीकरण सुरु आहे. सीरम इन्स्टिटयूटद्वारे तयार केलेली कोविशील्ड, भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन आणि रशियातून आयात केलेल्या स्पुटनिक व्ही लशींचा यात समावेश आहे. आतापर्यंत देशात १८ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.




