भूमी पेडणेकरलाही कोरोनाची लागण; अक्षय कुमार रुग्णालयात, तर ‘राम सेतु’शी संबंधित ४५ जणांना कोरोना
मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने रविवारी (4 एप्रिल) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची लागण झाली असून आयसोलेट केल्याचं सांगितलं होतं. अक्षय कुमार रुग्णालयात दाखल झाला असून त्याच्या आगामी ‘राम सेतु’ चित्रपटाशी संबंधित 45 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज हजारो लोक या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत. सामान्य जनताच नाही तर, बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स देखील या विषाणूला बळी पडले आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar) आणि गोविंदा (Govinda) यांच्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हीलादेखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याबद्दल माहिती दिली आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आणि सांगितले की, तिला कोरोनाची लक्षणे आहेत आणि तीने स्वत:ला घरीच क्वारंटाईन केले आहे. ती म्हणाली, मी डॉक्टरांनी दिलेल्या प्रोटोकॉलचे अनुसरण करत आहे. आपण माझ्या संपर्कात आला असल्यास, कृपया त्वरित आपली चाचणी करून घ्या. मी स्टीम, व्हिटामिन सी आणि पौष्टिक अन्न खात आहे. तसेच, माझे मन प्रसन्न ठेवत आहे. कृपया या परिस्थितीला हलक्यात घेऊ नका. मीसुद्धा सर्व खबरदारी घेतल्या होत्या, तरी देखील मी या विळख्यात अडकले. नेहमी मास्क घाला, आपले हात स्वच्छ धुवा आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करा.