राजकारण

शरद पवारांकडून विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी ममतांचे अभिनंदन

मुंबई: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी एकहाती भाजपला धूळ चारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करुयात, असे शरद पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत आहेत. सध्याच्या आकेडवारीनुसार, तृणमूल काँग्रेस २०२ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ८६ जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार २०० पार’च्या वल्गना करणारा भाजप १०० जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. तुर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.

शरद पवार हे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ममता बॅनर्जी यांचा प्रचार करणार होते. काँग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार यांना पत्र लिहून बंगालमध्ये प्रचाराला येऊ नये, अशी विनंती केली होती. मात्र, ही विनंती डावलून शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या मदतीला जाण्याचे ठरवले होते. मात्र, अचानक शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे शरद पवार यांचा पश्चिम बंगाल दौरा रद्द करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button