राजकारण

स्वातंत्र्यवीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते : मोहन भागवत

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विविध स्तरावरून मोठी विधाने केली जात असल्याचे पाहायला मिळाले. अलीकडेच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी वीर सावरकराच्या संसदेत लावलेल्या तसबिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी वीर सावरकरांबाबत अनेक मोठी आणि महत्त्वाची विधाने करण्यात आली. स्वातंत्रवीर सावरकर हे मुस्लिमांचे शत्रू नव्हते. त्यांनी उर्दूमध्ये गझल लिहिल्यात. वीर सावरकरांबद्दल आजही चुकीची माहिती समाजात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर हु कुड हॅव प्रीवेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. स्वातंत्र्यापासून वीर सावरकरांविषयी लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. पण आता लोक या पुस्तकाद्वारे वीर सावरकरांना ओळखू शकतील. त्यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद आहेत. त्यांच्याबद्दल योग्य माहितीही लोकांना उपलब्ध करून दिली जाईल, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

आजही भारतात वीर सावरकरांविषयी माहितीचा अभाव आहे, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती आहे. जे भारतातील एकतेच्या विरोधात आहेत त्यांना सावरकर आवडत नाही. सावरकरांचा असा विश्वास होता की, राष्ट्रीयत्व त्यांच्या उपासनेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करत नाही आणि ते हिंदू राष्ट्रीयत्व आहे. येथे प्रत्येकजण समान आहे, म्हणून विशेषाधिकारांबद्दल बोलू नका. हिंदुत्वाचे सावरकरांचे हिंदुत्व, विवेकानंदांचे हिंदुत्व असे वर्णन करणे ही आता एक फॅशन आहे. हिंदुत्व एक होते, आहे आणि शेवटपर्यंत एक राहील, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.

सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते आणि त्यांनी उर्दूमध्ये गझल लिहिली होती. मतभेद स्वाभाविक आहेत. जरी आपण वेगळे असलो तरी आपण एकत्र चालत राहू, वादविवाद होईल. हा आपल्या राष्ट्रीयत्वाचा मूलभूत घटक आहे. ज्यांना ते माहिती नाही त्यांनी सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम सुरू केली आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितले.

सावरकरांनी गांधीजींच्या सांगण्यावरुन दया याचिका दाखल केली : राजनाथ सिंह

अंदमानच्या तुरुंगात कैद असताना महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच विनायक सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका दाखल केली होती, असं विधान यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल मतभेद असू शकतात. पण, त्यांच्या विचारसरणीवरुन त्यांचे देशासाठीचे योगदान नाकारता येणार नाही. एका विशिष्ट विचारधारेने प्रभावित झालेला गट सावरकरांच्या जीवन आणि विचारधारेपासून अपरिचित आहे आणि त्यांना सावरकरांची योग्य समज नाही. काहीजण त्यांच्या योगदानावर प्रश्न उपस्थित करतात. पण, सावरकर एक महान स्वातंत्र्य सेनानी आणि महाननायक होते, आहेत आणि भविष्यातही असतील. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्याची इच्छाशक्ती किती प्रबळ होती, याचा अंदाज यावरुन घेता येतो की, ब्रिटिशांनी त्यांना दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली. काही विशिष्ट विचारसरणीने प्रभावित झालेले लोक अशा राष्ट्रवादी नायकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.

संरक्षण मंत्री पुढे म्हणतात की, काही विशिष्ट लोक सावरकरांवर नाझी, फॅसिस्ट असल्याचा आरोप करतात. पण, सत्यात ज्यांनी असे आरोप केले, ते स्वतः लेनिनवादी, मार्क्सवादी विचारसरणीने प्रभावित झाले आणि अजूनही आहेत. साध्या शब्दात सांगायचे तर, सावरकर हे ‘वास्तववादी’ आणि ‘राष्ट्रवादी’ होते, ज्यांनी बोल्शेविक क्रांतीसह निरोगी लोकशाहीची चर्चा करायचे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button