Top Newsराजकारण

दहशतवाद वाढलाय, किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा; संजय राऊतांची खोचक टीका

आघाडीच्या मंत्र्यांनी खुर्च्या उबवू नयेत, भाजपला सडेतोड उत्तर द्या

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून विविध मुद्द्यांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते व सरकारमधील मंत्र्यांवर होत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार तोफ डागली आहे. दुसरीकडे, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच असून, परिस्थिती चिघळली आहे. यातच आता काश्मीरमध्ये दहशवाद वाढला आहे. ईडी, सीबीआय आणि किरीट सोमय्यांना तिकडे पाठवा, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

ईडी, सीबीआय व एनसीबीला जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. खूप शक्तिशाली लोक आहेत. दहशतवादी पळून जातील. तुम्ही इथे आमच्या सरकारवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून हल्ले करत आहात. तुम्ही या संस्था बदनाम केल्या आहेत. किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा. फिरू द्या त्यांना जम्मू, काश्मीर, अनंतनाग आणि बारामुल्लामध्ये. दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ. जम्मू काश्मीर फिरत बसतील, असा संताप संजय राऊत यांनी यंत्रणांच्या कारवाईसंदर्भात बोलताना व्यक्त केला. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी चंद्रकांत पाटील यांनी ज्या शब्दामध्ये उल्लेख केला हे शोभते का? काश्मीरमध्ये त्या दहशतवाद्यांच्या संदर्भात बोला. त्यांना दम द्या आम्हाला शहाणपणा शिकवू नका, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला. याशिवाय कलम ३७० रद्द झाल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली की नाही, हे सांगता येणार नाही. तेथील परिस्थितीसंदर्भात बातम्या बाहेर येऊ दिल्या नाहीत. तिथे इंटरनेट बंद होते. तिथे अनेक बंधने होती. त्यामुळे अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीत. परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकार काय करत आहे, हे गृहमंत्र्यांनी समोर येऊन सांगावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

काश्मिरी पंडित, शीख नागरिक व बिहारी मजुरांचे खून पडत आहेत. या घटनांची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे. चीन हा लडाख आणि तावांगमध्ये घुसला आहे. नुसत्या धमक्यांची भाषा करून हे थांबणार नाही. चीनवरही सर्जिकल स्ट्राइक करायला हवा, असे स्पष्ट करत पाकिस्तानसोबत कसे संबंध प्रस्तापित करायचे याचा निर्णय सरकारला एकदा घेऊ द्या मग आम्ही बोलू. तुम्ही तुमच्या मतलबाप्रमाणे राजकीय सोईच्या भूमिका घेता आणि काश्मीरची जनता रोज तिथे मरते आहे. हे चालणार नाही. काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे एवढेच सांगू शकतो, असे संजय राऊत म्हणाले.

आघाडीच्या मंत्र्यांनी खुर्च्या उबवू नयेत, भाजपला सडेतोड उत्तर द्या

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांवर, मंत्र्यांवर भाजपचे नेते भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना नुसत्या खुर्च्या उबवू नका, तर भाजपला सडेतोड उत्तर द्या, असं आवाहन केलं आहे. संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांना आवाहन केलं. महाविकास आघाडीतल्या सगळ्याच मंत्र्यांना आवाहन आहे, की नुसतेच खुर्च्यांवर बसु नका. प्रति हल्ले करा, टोल्याला टोला , हे आठ दिवसात पळून जातील, असं राऊत म्हणाले.

तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन चित्रा वाघांचा जोरदार टोला

संजय राऊतांच्या टीकेला आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाविकास आघाडीला आयकर विभाग आणि ईडीची एवढी भीती वाटतेय. सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनात चांदणं’ दिसतंय, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावलाय.

महाविकास आघाडीला आयकर विभाग आणि ईडीची एवढी भीती वाटतेय. सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनात चांदणं’ दिसतंय. केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणा-या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय. हे अलीबाबा अन् ४० चोरांचं सरकार. चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल, असं ट्विट करुन चित्रा वाघ यांनी राऊतांना टोला हाणलाय.

सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते.. चुकवलेले लाखों रूपये मागच्या दारानं लपत छपत पुन्हा जमा करावे लागले… याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर आहे. आता आदळआपट करून उपयोग नाही.. ‘जैसी करणी, वैसी भरणी…, असं ट्विटही चित्रा वाघ यांनी केलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button