मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील काही नेते उद्या (मंगळवार, दि. ८ जून रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान लसीकरण, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यांच्यासह राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान मराठा आरक्षणायासंदर्भात देखील चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत केंद्र सरकारने काय केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मोदी-ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट होत आहे. या भेटीतून मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता असल्याने त्याकडे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे.