राजकारण

चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाहीत, मी भूमिका बदलत नाही : राज ठाकरे

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला आहे. तसेच माझ्या स्पष्ट असतात. बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना १०० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली. भाजपसोबत मनसेची युती होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. तुम्हीच प्रश्न निर्माण करता आणि आम्हाला उत्तर विचारता. मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही. मी बोललो होतो क्लिप पाठवेल. त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही. त्यांना याबाबत विचारणार आहे. माझं भाषण हिंदीत होतं. ते हिंदी भाषिकांना आवडलं. तुम्हाला कळलं नसले तर तुम्हाला पाठवतो, असं मी चंद्रकांत पाटील यांना म्हणालो होतो. त्यावर, मला पाठव. माल नक्की ऐकायला आवडेल, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एकदोन जणांशी याबाबत बोललो होतो. त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्याबाबत राज यांना विचारण्यात आलं. त्यावर, भूमिका क्लिअर काय करायच्या. माझ्या भूमिका क्लिअर आहेत. माझ्या भाषणात बैल मुतल्यासारखा मी विचार नाही करत. बैल उभ्या उभ्या चालता चालता मुततो. तसा विचार करत नाही मी. माझ्या भूमिका आजपर्यंत मांडल्या त्या अत्यंत स्पष्ट आहेत. त्या देश हिताच्या आहेत आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत. त्यात प्रत्येक राज्यांनी आपली भूमिका कशी निभावली पाहिजेत. काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही आमच्यावर आक्रमण करू नका. आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही. आसाम आणि मिझोराममध्ये सध्या तेच होत आहे, असं ते म्हणाले.

माझा भूमिकांना विरोध असतो. व्यक्तीला नाही. हे मी अनेकदा स्पष्ट केलं आहे. मोदी असतील किंवा अमित शहा असेल यांच्याशी माझं वैयक्तिक देणघेणं नाही. ज्या भूमिका पटल्या नाहीत त्याला विरोध केला आणि ज्या पटल्या त्याचं जाहीर अभिनंदनही केलं आहे. त्याचं समर्थनही केलं. त्या समर्थनासाठी मोर्चाही काढला आहे. जे पटत नाही ते पटत नाही सांगणं महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टीसाठी छक्केपंजे करू का?, असंही ते म्हणाले.

महापालिका निवडणुकीत तुम्ही कुणाला टार्गेट करणार असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावेळी जो टारगट असेल त्याच्यावर टार्गेट करणार, असं उत्तर राज यांनी दिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button