पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट
Bomb blast at TMC office in Joypur, West Bengal
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. पण मतदानाच्या पूर्वसंध्येलाच तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यालयात बॉम्बस्फोट झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. बांकुरातील जॉयपूरच्या TMC कार्यालयात हा बॉम्बस्फोट झालाय. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी डावे आणि काँग्रेसच्या आघाडीवर आरोप केलाय. तर तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्ब बनवताना ही घटना घडल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय.
तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्वीट केलंय. “हिंसेची घटना ऐकूण दु:ख झालं. राजकीय तटस्थता कायम ठेवणे आवश्यक आहे आणि कायद्याबद्दल प्रतिबद्धता दर्शविली जाणे आवश्यक आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांना योग्य ती शिक्षा होईल”, असं धनखड यांनी म्हटलंय.
बांकुराच्या जॉयपूरमधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ माजली आहे. TMC नेत्यांनी डावे आणि काँग्रेस आघाडीवर आरोप केलाय. तर भाजपने मात्र तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्ब बनवताना हा स्फोट झाला असावा असं म्हटलंय. दुसरीकडे TMCच्या कार्यालयात बॉम्बस्फोट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मोठी हिंसा भडकली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट पाहायला मिळत आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या हिंसाचारात 3 लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले आहेत.
शनिवारी पहिल्या टप्प्यातील मतदान
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार काल थंडावला आहे. 27 मार्च म्हणजे शनिवारी 5 जिल्ह्यातील एकूण 30 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यातील बाकुंडा जिल्ह्यातील, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील 6, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील 7, झाडग्राम जिल्ह्यातील 4 तर पुरुलिया जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदान शनिवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत असणार आहे.
पहिल्या टप्प्यात सर्व बूथ संवेदनशील
पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी मतदान होणार आहे. यातील सर्व बूथ संवेदनशील आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 1 हजार 790 मतदान केंद्र आहेत. तर मतदारांची संख्या 73 लाख 80 हजार 942 आहे. सर्व संवेदनशील बूथवर केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान तैनात असणार आहेत. तशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. तर मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात पश्चिम बंगाल पोलीस असणार नाहीत. याबाबत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला होता. पण निवडणूक आयोगाने तो फेटाळून लावला.