लखनौ : बिहारमधील राजकीय वातावरणासोबतच उत्तर प्रदेशातही निवडणुकीपूर्वी राजकीय उलथापालथ दिसून येत आहे. बहुनज समाज पार्टीच्या ९ बंडखोर आमदारांनी मंगळवारी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. हे सर्व आमदार सकाळी ११ च्या सुमारास अचानक लखनौ येथील समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात पोहचले. त्याठिकाणी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासोबत त्यांची खूप वेळ चर्चा सुरू होती.
बसपाच्या बंडखोर आमदारांनी समाजवादी पक्षाच्या प्रमुखांची भेट घेतल्यानं हे आमदार भविष्यात सपाची वाट धरू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ते लवकरच अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा झेंडा हाती घेतील. मंगळवारी अखिलेश यादव यांची भेट घेणाऱ्यांमध्ये असलम राइनी, असलम अली चौधरी, मुज्तबा सिद्दीकी, हाकीम लाल बिंद, हरगोविंद भार्गव, सुषमा पटेल, वंदना सिंह, रामवीर उपाध्याय, अनिल सिंह यांच्या नावाचा समावेश आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे १९ आमदार निवडून आले होते. परंतु त्यानंतर आंबेडकरनगर येथील पोटनिवडणुकीत बसपाचा पराभव झाला. त्यानंतर रामवीर उपाध्याय आणि अनिल सिंह यांना पक्षाविरोधी कारवायांचा ठपका ठेवत पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी पार्टीतून निलंबित केले. मागील वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी बसपाच्या ७ आमदारांनी पक्षाच्या उमेदवाराचं समर्थन करण्याच्या प्रस्तावाला नकार दिला आणि त्यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला समर्थन दिले. या प्रकारामुळे मायावती यांनी आमदारांना पक्षातून काढून टाकलं होतं.
दरम्यान, मागील आठवड्यात मायावती यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ आमदारांपैकी एक रामअचल राजभर आणि पक्षाचे विधिमंडळ गटनेते लालजी वर्मा यांनाही पक्षविरोधी कारवायांमुळे बसपामधून काढून टाकलं. लालजी वर्मा १९९१ पासून बहुजन समाज पार्टीशी जोडले होते. रामअचल राजभर हे मायावती सरकारच्या चार टर्ममध्ये मंत्री होते.
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय उलथापालथी पाहायला मिळत आहेत. चिराग पासवान यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारत पक्षाच्या ५ आमदारांनी वेगळा गट बनवत चिराग यांनाच टार्गेट केले. जेडीयूच्या साथीने खेळलेल्या या खेळीनं चिराग पासवान यांना मोठा धक्का बसला. त्या पाठोपाठ आता उत्तर प्रदेशातील राजकारण तापले आहे.