
मुंबई : राज्यात तौत्के चक्रीवादळामुळे हाहा:कार माजला आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रातील तौत्के चक्रीवादळामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात ३, तर जळगावात दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आली आहे. अद्याप मुंबईतून जीवितहानी झाल्याची बातमी नाही.
पुढच्या काही तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी 120 किमी पर्यंत पोहोचण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी सावध राहावं. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
तौत्के चक्रीवादळ मुंबईजवळच्या समुद्रातून पुढे सरकत असताना मुंबईला वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी वारे आणि पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. दक्षिण मुंबईत वादळी वाऱ्याचा कहर सुरू असून दुपारी दोन वाजता वाऱ्याचा वेग ताशी ११४ किलोमीटर पर्यंत पोहचला होता. वादळी वाऱ्यांमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत. त्यात काही वाहनांचे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे.
मुंबईला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे मुंबईकर हादरून गेले आहेत. तौत्के चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याचा मोठा फटका मुंबईला बसला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महापालिकेची ६० स्वयंचलित हवामान केंद्रे असून या केंद्रांवर त्या-त्या ठिकाणी होत असलेल्या पावसाच्या नोंदी सह वाऱ्याच्या वेगाचीही नोंद घेतली जात आहे. या नोंदीनुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत सर्वाधिक वाऱ्याचा वेग हा कुलाबा परिसरात असणाऱ्या अफगाण चर्च नजीक नोंदविण्यात आला आहे. या ठिकाणी दुपारी १२.१५ वाजता १११ किलोमीटर प्रति तास एवढा वाऱ्याचा वेग नोंदविण्यात आला तर दुपारी दोन वाजता च्या सुमारास ११४ किलोमीटर प्रति तास एवढा वेग नोंदविला गेला. मुंबईत पुढच्या काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचवे
श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भेंडखोल येथे समुद्र उधणलेला आणि जोरदार वारे वाहत आहेत. याशिवाय रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पेक्षाही भयानक स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे रायगडवासी चिंतेत असून मागच्या निसर्ग वादळाच्या आठवणी अजूनही ताज्या असताना या चक्रीवादळाने हाहा:कार माजवला आहे. चक्रीवादळाच्या परिणामामुळे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. समुद्रालगत असलेल्या पश्चिम उपनगरांना पाऊस आणि वाऱ्याने अक्षरशः झोडपून काढलं आहे, पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी ३ तासात शंभर मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईत पावसाचा जोर वाढला; मरीन ड्राईव्हवर समुद्राचं रौद्र रुप
तौत्के चक्रीवादळाचा परिणाम मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी दुपारनंतर जास्त जाणवू लागला आहे. किनाऱ्याजवळ तर तुफान वेगाने वारे वाहात आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी ११ वाजल्यापासून तुफान पावसालाही सुरुवात झाली आहे. दरम्यान मरीन ड्राईव्ह येथे समुद्राच्या उंच लाटा पाहायला मिळाल्या आहे. समुद्राचं रौद्र रुप पाहून भीती वाटेल अशी स्थिती आहे. मुंबई आणि किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.
या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. #TauktaeCyclone
(२/५) pic.twitter.com/9QSUDE7NUq
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 17, 2021
जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी अपघाताच्या घटनाही समोर आल्या आहे. तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम आता कल्याण डोंबिवलीतही जाणवू लागला आहे. गेल्या अर्ध्या तासापासून शहरात जोरदार वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे शहरात ठिक ठिकाणी झाडं तसेच झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. डोंबिवली रेल्वे स्टेशन नजीक कोपरच्या दिशेने जाणाऱ्या सहाव्या मार्गिकेवरील ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याची घटना घडली. या मार्गिकेवरून लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईच्या दिशेने जातात .त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
हवामान खात्याचा नवा इशारा
हवामान विभागाने नवा इशारा देत मुंबईत अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असलं, तरी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांना मोठा फटका देत ते पुढे सरकत आहे. पुढच्या काही तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडेल, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी १२० किमी पर्यंत पोहोचण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी सावध राहावं. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईच्या परळ भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. तसंच अंधेरी सब वेसुद्धा पाण्याखाली गेल्याने तिथली वाहतूक बंद करण्यात आली आहे.
हवामान बदलाचा अंदाज देणारे ३ रडार नादुरुस्त
तौत्के चक्रीवादळाचा प्रभाव राज्यातील अनेक शहरांमध्ये दिसून येत आहे. किनारपट्टी व्यतिरिक्त इतर अनेक शहरात ताशी १८ किलोमीटर वेगानं वाहणारे वारे , सोसाट्याचा वारा आणी मध्येच येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी, असं वातावरण सध्या आहे. हे वातावरण जरी अल्हाददायक असलं तरी अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हवामानातील बदलाचा अचूक अंदाज व्यक्त करणाऱ्या राज्यातील ४ डॉप्लर रडारपैकी ३ रडार नादुरुस्त असल्याचा आरोप हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी केला आहे.
याबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयाला सूचित केल्याची माहितीही त्यांनी दिली. अशा आपत्कालीन परिस्थितीत जर यंत्रणा काम करत नसेल तर हाहाकार माजू शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केल्यानं याचं गांभीर्य वाढलं आहे. अरबी समुद्रात अतितीव्र चक्रीवादळ सक्रिय असताना आयएमडीचे मुंबई रडार बंद असल्याचं समोर येत आहे. मुंबई रडार बंद पडले असल्यास ऐन चक्रीवादळाच्या धोक्यादरम्यान रत्नागिरी ते पालघर आणि नाशिक ते सातारा या पट्ट्यातील हवामानाचे अचूक अंदाज मिळणं कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त सॅटेलाईट इमेजवर अवलंबून राहावे लागणार आहे.




