कोरोना रोखण्यासाठी मुंबईत मॉल्स, रेल्वे-बस स्थानकांवर अँटिजेन चाचण्या
मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून चाचण्या वाढवण्याकडे विशेष लक्ष दिलं जातं आहे. मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर अँटिजेन चाचण्या होणार आहेत. मुंबईतील 25 प्रमुख मॉलमध्ये प्रत्येक ग्राहकाची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानतंरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
मुंबईतील प्रसिद्ध पॅलेडियम, फिनिक्स, रुण्वाल, इन्फिनिटी, इनॉर्बिट यांसारख्या मोठ्या मॉलमध्ये दररोज हजारोंच्या संख्येनं लोक येत असतात. विक एन्डला तर मुंबईतील सर्व मॉलमध्ये लाखो लोकांची गर्दी होते. त्यामुळे मुंबईतील मोठ्या मॉलमध्ये प्रवेशासाठी अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी बंधनकारक केल्यास आपोआप गर्दीला आळा बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील खाऊ गल्लीचा स्टाफ आणि मुंबईतील रेस्टॉरंटच्या स्टाफची कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील बाहेरगावच्या रेल्वे येणारे 7 मुख्य रेल्वे स्थानकातही प्रवाशांच्या चाचण्या केल्या जाणार आहे. यात वांद्रे, दादर, बॉम्बे सेंट्रल, सीएसएमटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर दर दिवसाला प्रत्येकी किमान 1 हजार प्रवाशांच्या चाचण्या होणार आहे.
विशेषत: विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाचं विशेष लक्ष असणार आहे. मुंबईतील मुख्य बस स्थानक दादर, परळ येथे दररोज 1 हजार प्रवाशांच्या चाचण्या होणार आहे. मुंबईत दिवसाला 50 हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष आहे. सध्या मुंबईत दिवसाला 20 ते 23 हजार चाचण्या केल्या जात आहे.
तर खाजगी हॉस्पिटलमधील लसीकरण वाढवण्यासाठीही पालिका कडक पावलं उचलणार आहे. मुंबईतील 43 खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. मात्र खासगी हॉस्पिटलमध्ये दरदिवसाला किमान 1 हजार लसीकरण करण्याची सक्ती करण्यात आली आहे. सध्या सरासरी 45 हजार लोकांचे मुंबईत दररोज लसीकरण होते आहे. यापैकी केवळ 5 हजार लोकांचे लसीकरण खाजगी हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहे.