आरोग्य

कोरोनाचा भीषण उद्रेक; राज्यात दिवसभरात ४७ हजार ८२७ रुग्णांची भर

जगातील सर्वात मोठ्या कोरोना हॉटस्पॉटमध्ये महाराष्ट्राचा समावेश

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबत नागरिकांना माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठ्या कोरोना हॉटस्पॉटमध्ये महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. या यादीत महाराष्ट्र चौथा स्थानी आहे. याशिवाय आशिया खंडात एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचा इतका भीषण उद्रेक झालेला पाहायला मिळाला. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अनेक शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होतेय. राज्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल 47 हजार 827 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 24 हजार 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 202 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णांचा हा आकडा राज्याची चिंता वाढवणारा आहे.

ज्या युरोप आणि अमेरिकेला कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वात मोठा फटका बसला त्यांनाही मागे टाकत महाराष्ट्र पुढे गेलाय. महाराष्ट्र युरोप, अमेरिकेपेक्षाही डेंजर झोनमध्ये गेलाय. सध्या एकट्या महाराष्ट्रात आशिया खंडातल्या कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक रुग्ण निघतायत. जगाचा विचार केला, तर मागच्या 24 तासात फक्त महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

1 एप्रिलला जगभरातील विविध देशांमध्ये किती कोरोना रुग्ण आढळले याची आकडेवारी समोर आलीय. यानुसार त्या 24 तासात ब्राझिलमध्ये 89 हजार 459 रुग्ण निघाले. तिकडे अमेरिकेत 76 हजार 789 नवे रुग्ण सापडले. युरोपच्या फ्रान्समध्ये 50 हजार 659 रुग्ण आढळले. या तिन्ही देशानंतर चौथ्या स्थानी महाराष्ट्राचा समावेश झालाय. 1 तारखेला महाराष्ट्रात 43 हजार 183 रुग्णांची नोंद झाली. हा आकडा राज्यातला आजवरचा सर्वाधिक आणि जगातला चौथ्या क्रमांकाचा मोठा आकडा ठरलाय.

राज्यात सध्या 3 लाख 89 हजार 832 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.62 टक्के झालं आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.91 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 21 लाख 1 हजार 999 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 19 हजार 237 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतील कोरोना स्थितीही गंभीर

मुंबईतील कोरोना स्थितीही दिवसेंदिवस बिघडत आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात 8 हजार 832 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर 5 हजार 352 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरात 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 16 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 13 पुरुष तर 7 महिलांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 84 टक्क्यांवर पोहोचलाय. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 46 दिवसांवर आला आहे. 26 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.46 टक्के झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button