कोरोना संकटातून सावरण्यासाठी केरळ सरकारचे २० हजार कोटींचे पॅकेज
नागरिकांवर नवा कर न लादता लसीकरणावर भर

तिरुवनंतपूरम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संकटातून सावरण्यासाठी केरळ सरकारने २० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. तसेच १८ वर्षांवरील व्यक्तींच्या मोफत लसीकरणासाठी एक हजार कोटींची स्वतंत्र तरतूद केली आहे. त्याशिवाय मोफत लसीकरणासाठी संबंधित उपकरणे आणि सुविधा देण्यासाठी ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
राज्याचे अर्थमंत्री के. एन. बालगोपाल यांनी ही माहिती दिली. मागच्यावेळीही २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्याचा महामारी रोखण्यासाठी वापर करण्यात आला. आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे दुसऱ्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणे, त्यांच्या दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवणे आणि कोरोना रोखण्यासाठी उपया योजना करण्यासाठी हे २० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असं बालगोपाल यांनी सांगितलं. तसेच राज्यातील जनतेवर कोणताही नवा कर लादण्यात येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
देशात कोरोनाचं संकट सुरूच आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पुनरुज्जीवीत करण्याचा मागच्या बजेटचा उद्देश होता. मात्र कोरोनामुळे ते होऊ शकले नाही. म्हणून यावेळी कोरोनावर पूर्ण रोखणं हे आमचं उद्दिष्टं आहे, असं सांगतानाच ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोविड रोखण्यासाठी मोठ्या बजेटची गरज पडणार आहे, असं ते म्हणाले.
नोकरी गमावलेल्यांना मदत
दरम्यान, कोरोना संकटामुळे नोकरी गमावलेल्यांना आर्थिक मदत देणं सुरू ठेवावं लागेल, असं ते म्हणाले. या पॅकेजमध्ये मोफत लसीकरणाची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्याने या वर्षी ६.६ टक्के आर्थिक विकास दराचं लक्ष्य ठेवलं आहे, असंही ते म्हणाले.