Top Newsआरोग्य

राज्य पूर्णपणे ‘अनलॉक’ नाहीच, निर्बंध ‘जैसे थे’; ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा झाली. निर्बंध शिथिल केले जाईल अशी शक्यता होती, पण ‘जैसे थे’च परिस्थिती ठेवण्यावरच सरकारचा कल पाहण्यास मिळाला आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या ३ आठवड्यात रुग्ण संख्या स्थिर आहे. पण १० जिल्ह्यांमध्ये ९२ टक्के रुग्ण आहे. त्यामुळे लेव्हल ३ मध्ये अनेक जिल्हे आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असंही टोपे यांनी स्पष्ट केले. तसंच, ज्या व्यापाऱ्यांनी लशीचे दोन डोस घेतले आहे. त्यांनी दुकानं खुले ठेवण्याबाबत मागणी केली होती. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र नागरिकांनी मोठ्या प्रमाणाक गर्दी करायला सुरुवात केली आहे. तज्ज्ञांनी कोरोना साथीच्या तिसर्‍या लाटेचा इशारा दिल्यानंतरही लोक खबरदारी घेत नाहीत. राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जलै रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत महत्वाची बैठक घेतली होती. त्यानंतर ९ जुलै रोजी राज्य आपत्कालिन विभागातील अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेतली होती. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी या दोन बैठकांमध्ये महत्वाची चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल मागितला होता.

लोकल ट्रेनबाबत कोणताही निर्णय नाही

पुढील आठवड्यांपासून निर्बंधात असलेलं महाराष्ट्र राज्य टप्प्याटप्याने अनलॉक होणार असल्याचं बोललं जात होतं. पण, राज्य सरकारने कोणतेही निर्बंध हटवण्यास निर्णय घेतला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय पुन्हा बारगळला आहे. रेल्वे प्रवासी संघटना आणि सामान्य नागरिकांकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, राज्य सरकारने सावध भूमिका घेत तुर्तास तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button