भारतीय महिला क्रिकेटपटू अंशुला राववर डोपिंग विरोधात कारवाई; चार वर्षांची बंदी
नवी दिल्ली : खेळांमध्ये अनेकदा शॉर्टकट वापरण्याच्या नादात अनेक खेळाडू डोपिंगला बळी पडतात. स्टेरॉईड्स, स्टिम्युलंट्स, नार्कोटिक्स, डायुरेटिक्स, पेप्टाईड हार्मोन्स आणि ब्लड डोपिंग अशा प्रकारे क्रीडा क्षेत्रात डोपिंग केले जाते. या सर्वांमुळे शरीराची मोठी हाणी होत असली तरी असे प्रकार जगभरात केले जातात. भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ देखील वर्षभरापूर्वी डोपिंगच्या प्रकरणात अडकला होता. त्यानंतर आता मध्य प्रदेशची अष्टपैलू क्रिकेटपटू अंशुला राव ही देखील डोपिंग प्रकरणात अडकली असून असे करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (National Anti Doping Agency) नाडा (NADA) ने कडक कारवाई करत करत मध्य प्रदेशच्या अंशुलाला दोषी सिद्ध केले आहे. त्यामुळे तिच्या खेळण्यावर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
अंशुला रावने मध्यप्रदेश संघाचे बीसीसीआयद्वारा आयोजित अंडर-२३ टी-२० टूर्नामेंटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. मात्र आता तिला ‘एनाबोलिक स्टीरॉयड १९-नोरैंड्रोस्टेरोन’ या पदार्थाचे सेवन करताना दोषी ठरवले गेले आहे. याधी १४ मार्च, २०२० मध्येही तिने याच पदार्थाचे सेवन केल्याचे आढळले होते. अंशुलाचे सँपल चाचणीसाठी बेल्जियमला पाठविण्यात आले. तेथील लॅबमध्ये अंशुलाने कोणत्याही वैद्यकीय कारणासाठी संबंधित औषधं घेतली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला.