Top Newsस्पोर्ट्स

टी-२० विश्वचषक : पाकिस्तानच्या विजयाची हॅटट्रिक अन् वेस्ट इंडिजचा पहिला विजय

दुबई : : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आजचे दोन्ही सामने थराररक झाले. गतविजेत्या वेस्ट इंडिजनं अखेरच्या चेंडूवर बांगलादेशवर विजय मिळवला, तर अफगाणिस्तानचे कवडे आव्हान परतवून लावताना पाकिस्तानं विजयाची हॅटट्रिक साजरी केली. पाकिस्ताननं या विजयासह ग्रुप २ मधून उपांत्य फेरीची दावेदारी निश्चित केली आहे, पण वेस्ट इंडिजच्या विजयानं ग्रुप १ समीकरण बिघडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत..

गतविजेत्या वेस्ट इंडिजचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम राखले आहे. बांगलादेशविरुद्ध रोमहर्षक ठरलेल्या लढतीत वेस्ट इंडिजनं ३ धावांनी बाजी मारली. बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाह व लिटन दास यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आंद्रे रसेलच्या अखेरच्या षटकानं त्यांना हार मानण्यास भाग पाडले. अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना रसेलनं त्याचा सर्व अनुभव एकवटून सुरेख चेंडू टाकला. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना रोस्टन चेस ( ३९) व निकोलस पूरन ( ४०) यांच्या खेळीच्या जोरावर ७ बाद १४२ धावा केल्या. प्रत्युत्तरात लिटन दास ( ४४) व महमुदुल्लाह (३१*) यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यांना ५ बाद १३९ धावाच करता आल्या.

बांग्लादेशने सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. त्यानंतर बांग्लादेशच्या गोलंदाजानी चांगली कामगिरी करत वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला टिकू दिलं नाही. केवळ रोस्टन चेज (३९) आणि निकोलस पूरन (४०) यांनी टिकून फलंदाजी केल्यामुळे वेस्ट इंडिजने १४२ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या बांग्लादेश संघाची सुरुवात खास झाली नाही. अखेरच्या षटकात महम्मदउल्लाने नाबाद ३१ धावा करत विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात अखेर बांग्लाेदेशला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

अफगाणिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजय पाकिस्तानसाठी खेचून आणला

अफगाणिस्तान आणि सेमी फायनल यांच्या मार्गात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम उभा राहिला. अफगाणिस्ताननं ठेवलेल्या १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पण, बाबर व फाखर जमान यांनी डाव सावरला. राशिद खाननं उत्तम गोलंदाजी करून सामना अटीतटीचा बनवला, परंतु पुन्हा एकदा आसिफ अली पाकिस्तानसाठी धावला. त्यानं एकाच षटकात ४ षटकार खेचून पाकिस्तानला सलग तिसरा विजय मिळवून दिला.

अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझरतुल्लाह झझाई (०) व मोहम्मद शाबजाज (८) यांना अुक्रमने इमाद वासीम व शाहिन यांनी बाद केले. त्यानंतर टप्प्याटप्पानं अफगाणिस्तानच्या विकेट्स पडतच होत्या. पण, त्यांचा प्रत्येक फलंदाज आक्रमक पवित्र्यातच होता. रहमनुल्लाह गुर्बाज ( १०) व अस्घर अफघान ( १०) हेही आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसले. करीन जनत ( १५) हा बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानची अवस्था ६ बाद ७६ अशी झाली होती. नजिबुल्लाह झाद्रान व कर्णधार मोहम्मद नबी यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु २२ धावांवर झाद्रान बाद झाला. नबी व गुलबदीन नैब या जोडीनं अफगाणिस्तानला सन्मानजक धावसंख्या उभी करून दिली. नबी ३५ आणि नैब ३५ धावांवर नाबाद राहिले. या जोडीनं अखेरच्या पाच षटकांत धावांचा पाऊस पाडला आणि संघाला ६ बाद १४७ धावा उभ्या करून दिल्या.

पाकिस्तानची सुरूवात साजेशी झाली नाही. मोहम्मद रिझवाद ८ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आजम आणि फाखर जमान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. मुजीब उर रहमाननं अफगाणिस्तानला पहिले यश मिळवून दिले. १२ धावांवर पहिली विकेट पडूनही बाबर खेळपट्टीवर अडून बसला. बाबर व जमान यांनी पाकिस्तानला ११ षटकांत १ बाद ७५ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. राशीद खानच्या गोलंदाजीवर डीआरएसमुळे जीवदान मिळालेल्या बाबरनं अर्धशतकी खेळी केली. पण, फाखर २५ चेंडूंत ३० धावांवर बाद झाला. मोहम्मद हाफिज ( १०) पुन्हा अपयशी ठरला.

१७व्या षटकात राशिदच्या गोलंदाजीवर बाबरला जीवदान मिळालं, नवीननं त्याचा झेल सोडला. पण, त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राशिदनं त्रिफळा उडवत ५१ धावा करणाऱ्या बाबरला माघारी पाठवलं. पुढच्याच षटकात नवीन-उल-हकनं सोडलेल्या झेलची वसूली केली आणि शोएब मलिकची ( १९) महत्त्वाची विकेट घेतली. पाकिस्तानला १२ चेंडूंत २४ धावांची गरज होती आणि आसिफ फलीनं १९व्या षटकात करीम जनतला चार खणखणीत षटकार खेचून सर्व दडपण झुगारून लावलं आणि पाकिस्तानला ५ विकेट्स व ६ चेंडू राखून जिंकवलं. आसिफनं ७ चेंडूंत २५ धावा केल्या.

स्पर्धेला गालबोट; पाकिस्तानी चाहत्यांना बदडले

मैदानावर या दोन संघांमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळताना मैदानाबाहेरही नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाले. अफगाणिस्तानला चिअर करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं चाहते उपस्थित होते आणि त्यातील बरेचसे विनातिकिटच स्टेडियममध्ये घुसले होते. होय हे खरं आहे. सुरक्षारक्षकांना न जुमानता अफगाणिस्तानचे चाहते स्टेडियममध्ये घुसले आणि तिकिट असूनही पाकिस्तानी चाहत्यांना बाहेरच थांबावे लागले. हे भांडण इथेच थांबले नाही, तर स्टेडियममध्ये दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचेही पाहायला मिळाले.

ग्रुप १

या गटात इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हे प्रत्येकी ४ गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शनिवारी उभय संघ एकमेकांना भिडणार आहेत आणि त्यातील विजेता हा अव्वल स्थानासह या गटातून उपांत्य फेरीकडे कूच करेल. विंडीजच्या आजच्या विजयानं या गटात फार फरक पडणार नाही. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्या खात्यात प्रत्येकी २ गुण असले तरी विंडचे तीन सामने झाले आहेत. प्रत्येकी दोन सामने खेळणाऱ्या आफ्रिका व श्रीलंकेला अजून संधी आहे, परंतु त्यांना उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. श्रीलंकेसमोर आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज आहेत, तर आफ्रिकेसमोर श्रीलंका, बांगलादेश व इंग्लंड यांचे आव्हान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button