Top Newsइतरफोकस

युद्धाचा भडका; रशियाकडून युक्रेनच्या लष्कराचे ७४ तळ उद्‌ध्वस्त

चर्चेतून मार्ग काढा, नाटोसोबत संवाद साधा; मोदींचे पुतीन यांना आवाहन

कीव्ह/मॉस्को/नवी दिल्ली : अमेरिकेसह काही देशांनी लादलेल्या कडक निर्बंधांची पर्वा न करता रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. युक्रेन व रशियाच्या लष्करात झालेल्या संघर्षात १०० हून अधिक जण ठार झाले आहेत. गुरुवारी भारतीय वेळेनुसार सकाळी सव्वा आठ वाजता रशियाच्या विमानांनी युक्रेनमधील कीव्ह, खार्किव्ह यासह काही शहरांवर भीषण बॉम्ब व क्षेपणास्त्रांचे हल्ले केले. दरम्यान, रशियन सैन्यांचा चर्नाेबिल अणू प्रकल्प ताब्यात घेण्याचे प्रयत्न असल्याचा आराेप युक्रेनचे राष्ट्रपती वाेलाेदिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. तर ब्रिटनचे पंतप्रधान बाेरीस जाॅन्सन यांनी रशियावर कठाेर निर्बंध जाहीर केले. ब्रिटनमधील सर्व प्रमुख रशियन बॅंकांच्या मालमत्ता गाेठविण्यात आल्या असून सर्व वित्तीय संस्थांवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, युद्धाची झळ संपूर्ण जगाला सोसावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. नाटो आणि रशियातील मतभेत केवळ संवादातून दूर होऊ शकतात. त्यामुळे चर्चा करून प्रश्न सोडवण्यात यावा, असं आवाहन मोदींनी पुतीन यांनी केलं. पंतप्रधान कार्यालयानं याबद्दलची माहिती दिली आहे.

दरम्यान, रशियाने युक्रेनी लष्कराचे ७४ तळ उद्‌ध्वस्त केले असून त्यात हवाई दलाच्या ११ तळांचा समावेश असल्याचा दावा रशियाने केला आहे. तर रशियाची ६ लढाऊ विमाने व एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाचे सैन्य कीव्हपर्यंत पोहोचले. तसेच रशियाचे काही रणगाडेही उद्ध्वस्त केल्याचे युक्रेनने म्हटले आहे.

रशियाने युक्रेनवरील लष्करी कारवाई ताबडतोब थांबवावी व आपले सैन्य माघारी न्यावे, असा इशारा नाटोने दिला आहे. अनेक लढाऊ विमाने तसेच भूमध्य सागराच्या हद्दीत १२०हून अधिक युद्धनौकांचा ताफा नाटोने सज्ज ठेवला आहे.

पुतीन यांचा इशारा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा करताच पुढील पाच मिनिटांत युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले सुरू झाले. युक्रेनवर रशिया, बेलारूस आणि क्रिमिया या तीन बाजूंनी हल्ला करण्यात आला आहे. लुहान्स्क, खार्कीव, चेर्नीव, सुमी आणि जेटोमीर या प्रांतांवर हल्ले करण्यात आले आहेत. रशियन पायदळानेही युक्रेनमध्ये घुसून सीमावर्ती भागातील काही गावांवर कब्जा मिळवला आहे.

युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणात कोणीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी कधी पाहिले नव्हते इतके गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिका व अन्य देशांचे नाव न घेता दिला. युक्रेनने ‘नाटो’मध्ये सामील होऊ नये, या रशियाने सातत्याने केलेल्या मागणीकडे अमेरिका व तिच्या मित्रदेशांनी दुर्लक्ष केले, असा आरोप पुतिन यांनी केला आहे. युक्रेनवर कब्जा करण्याचा आमचा अजिबात विचार नाही, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींचं पुतीन यांना आवाहन

रशियानं युद्ध थांबवावं आणि नाटोसोबत संवाद साधावा. नाटो आणि रशियानं चर्चेतून मार्ग काढावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणावाची स्थिती आहे. आज रशियानं युद्धाची घोषणा करत युक्रेनवर हल्ले सुरू केले. त्यात आतापर्यंत ४० हून अधिक युक्रेनी नागरिकांचा जीव गेला आहे.

हिंसाचार थांबवून संबंधितांनी राजनैतिक मार्गानं चर्चा करायला हवी. संवादातून प्रश्न सोडवायला हवा, असं मोदी पुतीन यांना म्हणाले. यावेळी रशियन अध्यक्षांनी मोदींना युक्रेनमधील लष्करी कारवाईची माहिती दिली. पुतीन यांच्याशी संवाद साधताना मोदींनी युक्रेनमधील भारतीयांबद्दल, विशेषत: विद्यार्थ्यांबद्दल चिंता व्यक्त केली. अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदींनी पुतीन यांनी सांगितलं.

दोन्ही देशांचे अधिकारी आणि राजदूत एकमेकांच्या नियमित संपर्कात राहतील याची हमी दोन्ही देशांच्या प्रमुखांनी एकमेकांना दिली. तत्पूर्वी संध्याकाळी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली.

भारतीय दुतावासाकडून विद्यार्थ्यांची सोय

कीव्हमध्ये भारतीय दूतावासाने जवळच्या एका शाळेमध्ये २०० हून अधिक विद्यार्थ्यांची साेय केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी दूतावासाने जी यंत्रणा उभारली आहे, त्यात तेथे कार्यरत असलेल्या मराठी अधिकाऱ्याची महत्त्वाची भूमिका आहे. माधव सुलफुले असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे आहेत, तर त्यांचे शिक्षण लातूरमध्ये झाले आहे. युक्रेनमध्ये सुमारे १५ ते २० हजार भारतीय अडकले असून त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत. हे भारतीय युक्रेनमधून पोलंडमार्गे भारतात येऊ शकतात.

यूक्रेनची भारताला साद

तत्पूर्वी भारतातील यूक्रेनचे राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी रशिया आणि यूक्रेन दरम्यान सुरु असलेल्या संघर्षात भारताने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. यूक्रेनच्या राजदूतांनी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करावी असा आग्रह धरलाय. पोलिखा म्हणाले की, सध्या यूक्रेनची अवस्था पाहता भारताने या प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे. भारत आता एक पॉवरफूल ग्लोबल प्लेयर आहे. त्यामुळे भारताने अन्य मोठ्या देशांप्रमाणे या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जगातील सर्वात ताकदवान नेत्यांपैकी एक आहेत. जगातील सर्वच देशांचे नेते त्यांचा पूर्ण सन्मान करतात. भारत आणि रशियाचेही मैत्रिपूर्ण संबंध आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button