स्पोर्ट्स

वकिलांसाठी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद : न्या. प्रकाश नाईक

नाशिक येथे शानदार सोहळ्यात न्यायाधीश, वकिलांच्या चौकार-षटकाराने स्पर्धेचे उद्घाटन

नाशिक : वकिली आणि क्रिकेट यांत खूप साम्य आहे, प्रत्येक वकिलाने क्रिकेटपासून शिकण्यासारखे खूप काही आहे. क्रिकेटमध्ये जसे टीम स्पिरीट महत्वाचे असते तसेच ते वकिली व्यवसायातही महत्वाचे आहे. क्रिकेट खेळातील बंधुता, मैत्र वकीलवर्गात रुजवण्यासाठी राज्यपातळीवर आयोजित होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन ही खरोेखरच कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगी बाब आहे, असे गौरवोद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. प्रकाश नाईक यांनी काढले.

नाशिक येथील स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात रविवारी पार पडलेल्या वकिलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. न्यायाधीश आणि वकिलांनी मैदानावर उतरत क्रिकेटचा छोटेखानी सामना खेळून या स्पर्धेचे अनोखे उद्घाटन केले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. संदीप शिंदे, न्यायाधीश दिलीप घुमरे, आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोनामुळे निधन पावलेल्या वकील बंधुंना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

न्या. संदीप शिंदे यांनी आपल्या भाषणात क्रिकेट आणि वकिली यांच्यातील साम्यस्थळे सांगताना, क्रिकेटमध्ये अंपायरचा निर्णय अंतिम असतो. मात्र एका न्यायालयाने दिलेले निर्णय मान्य नसेल तर वकिलाला वरच्या न्यायालयात दाद मागता येते, क्रिकेटमध्ये तसे होत नाही, असे सांगताना वकिलांनी केलेल्या बॅटींगवर जेव्हा न्यायाधीश निकाल देतात, ते जजमेंट हेच आमचे स्कोअर कार्ड ठरते अशी टिप्पणी केली. क्रिकेटप्रमाणेच वकिलांनी व्यवसायातही बंधुता, कामातील तत्परता दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्पर्धेचे आयोजक स्व. रामकृष्ण जगदाळे फाउंडेशन, नाशिक जिल्हा अ‍ॅडव्होकेटस क्रिकेट अ‍ॅण्ड स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे यांनी या स्पर्धेंच्या आयोजनामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. कोरोना काळात दोन वर्षानंतर भरवण्यात येणाऱ्या या स्पर्धेदरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांतून सहभागी झालेल्या खेळांडूना कोणतीही अडचण येणार नाही. स्पर्धा सांघिक भावनेने यशस्वी होईल याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी वकिलीत आणि क्रिकेटमध्येही फेअर प्ले असावा. राज्यभरातील जिल्हा न्यायालयातील वकिलांमध्ये सुसंवाद-सुसंगती येण्यासाठी आणि सांघिक भावनेत वाढ होण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. त्यासाठी स्व. रामकृष्ण जगदाळे फाउंडेशनच्या वतीने अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे यांनी घेतलेले परिश्रम शब्दांत मांडता येणार नाहीत, अशी कौतुकाची थाप दिली.

यावेळी अ‍ॅड. संजीव कदम यांनी जिल्हा अ‍ॅडव्होकेटस क्रिकेट अ‍ॅण्ड स्पोर्टस असोसिएशनला भरीव आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले, तर अ‍ॅड. महेश आहेर यांनी वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेला राजमुद्रित करण्याचे काम अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे यांनी केल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ के. के. घुगे, अलिम शेख, जयंत जायभावे, कमलाकर दिघे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या कोल्हापूर संघाने अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे यांना कोल्हापूरच्या अंबाबाईची, तर पंढरपूरच्या संघाने विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिकृती भेट दिली.

या कार्यक्रमात स्वातंत्र्यानंतरचे पहिले न्यायमूर्ती स्व. एम. सी. छागला यांच्या आत्मचरित्रातील निवडक उताऱ्यांचे संकलन असणारे ‘दस स्पोक द ग्रेट जज’ या नाशिक येथील ज्येष्ठ विधीज्ञ के.जे. दिघे लिखित पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे भूषण मतकरी यांनी केले, तर नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी राज्यभरातून आलेले वकील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यायाधीशांनाही सी.के.नायडूचा मोह पडतो तेव्हा…

कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना न्यायाधीश आणि ज्येष्ठ वकिलांनी क्रिकेटचे वेड प्रत्येकाच्याच ठायी कसे असते याबाबतचे अनेक किस्से सांगून कार्यक्रमाची रंगत वाढवली. न्यायाधीशांनाही थोर क्रिकेटपटू सी. के. नायडू यांच्या खेळाची मोहिनी कशी पडते आणि त्यासाठी ते आपल्या सहकारी वकिलांना कामकाजाला विलंब लावण्यास सांगतात आणि पुन्हा वकिलावरच ठपका ठेवून स्वतः स्टेडियमवर पोहोचतात आणि सी. के. नायडू यांच्या खेळीचा आस्वाद घेतात याचा रंजक किस्सा सांगितला. तर मिश्र खेळाडूंच्या एका क्रिकेट सामन्यात अंपायरने स्वतःच महिला खेळाडूचा कॅच घेतला आणि पुरुष फलंदाजाला बाद घोषित केल्याची आठवण ज्येष्ठ वकिलाने सांगितल्यानंतर उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button