अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविला; टीम इंडियाच्या ३ बाद १४६ धावा

लंडन : रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. पण, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कमबॅक करताना पहिल्या सत्रातच दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. कर्णधार विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांनी जवळपास १५ षटके खेळून काढली. मात्र, त्यांचा धावांची गत अत्यंत संथ होती. पुजारा ५४ चेंडूंत ८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर विराटनं उप कर्णधार अजिंक्य रहाणेसह भारताचा खेळ पुढे सुरू ठेवला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. जागतिक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताकडून सर्वाधिक पाचवेळा अर्धशतकी विक्रम या जोडीनं नावावर केला. अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा भारताची धावसंख्या ३ बाद १४६ होती.
रोहित शर्मा व शुबमन गिल यांची दमदार सुरूवात करून दिली, परंतु न्यूझीलंडचे गोलंदाज कायले जेमिन्सन व निल वॅगनर यांनी दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. रोहित ( ३४) व शुबमन (२८) यांची ६२ धावांची भागीदारी कायले जेमिन्सननं संपुष्टात आणली. विराट व पुजारा यांनी संयमी खेळ करताना टीम इंडियाचा डाव सावरला होता. पूजारानं ५४ चेंडूंत दोन चौकारांसह ८ धावा केल्या. पुजारा व विराट यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९५ चेंडूंत २५ धावांची भागीदारी केली. विराट व अजिंक्यनं चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना दुसऱ्या दिवशी भारताची धावसंख्या ३ बाद १४६ धावांपर्यंत नेली. विराट कोहली ४४, तर अजिंक्य रहाणे २९ धावांवर खेळत आहेत. भारतीय फलंदाजांनी ६४.४ षटकांत २.२५ च्या सरासरीनं धावा केल्या.
विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरनंतर चौथ्या क्रमांकावर ६००० हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला. भारताकडून कसोटीत हा पराक्रम करणारा विराट दुसराच फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकरनं १३४९२ धावा केल्या आहेत.
इंग्लंडमध्ये ६०० हून अधिक धावा करणारा विराट हा पहिलाच आशियाई कर्णधार आहे. विराटनं आतापर्यंत ६२६ धावा केल्या आहेत. महेंद्रसिंग धोनी ( 569), मोहम्मद अझरुद्दीन (४६८), अँजेलो मॅथ्यूज ( ४३१) आणि इम्रान खान (४०३) यांचा नंतर नंबर येतो. अजिंक्य रहाणेनेही कसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या.




