राजकारण

संजय राठोडांसाठी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे ‘सोशल डिस्टन्सिंग’!

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील नवे फोटो आणि व्हीडिओ समोर आल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय राठोडांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता वाढली आहे. संजय राठोड हे बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दीड तास ताटकळत राहावे लागले होते. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्याशी अवघी दोन मिनिटं जुजबी चर्चा करुन काढता पाय घेतला.

संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यग्र होते. त्यामुळे संजय राठोड यांना बराच काळ वाट पाहावी लागली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत हेदेखील वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. मात्र, संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का, याबाबत माहिती नाही. मात्र, एकूणच घटनाक्रम पाहता आगामी काळात शिवसेना नेतृत्त्वाकडून संजय राठोड यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

पोहरादेवी येथे गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत आता शिवसेनेनं खास ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. संजय राठोड हे बुधवारी नागपुरात दाखल झाल्यानंतर याचा प्रत्यय आला. यावेळी विमानतळावर एकही स्थानिक शिवसैनिक हजर नव्हता. विशेष म्हणजे संजय राठोड हे नागपूरचे संपर्कमंत्री आहेत. तरीही संजय राठोड यांच्या स्वागतासाठी एकही शिवसैनिक न येणे, ही सूचक बाब मानली जात आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री खासगीत संजय राठोड विषयावरून नाराज असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय. संजय राठोड शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून सीएम ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, असाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दबाव निर्माण केलाय. संजय राठोडप्रकरणी मुख्यमंत्री अधिवेशन सुरू होण्याआधी निर्णय घेतील, अशी अपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांनी व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलंय. सह्याद्री अतिथिगृहावर मंत्रिमंडळाची बैठक झाली, पण या बैठकीत संजय राठोड यांच्याविषयी कोणतीच चर्चा झालेली नाही. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते संजय राठोड प्रकरणात शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button