मुंबई : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. कारण शिवसेनेच्या विधानसभेच्या बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत (Trupti Sawant) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वांद्रे पूर्व या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मतदारसंघात, तृप्ती सावंत यांनी शिवसेनेचं प्रतिनिधीत्व केलं होतं. मात्र त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांचं तिकीट कापून, शिवसेनेने तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. इथे काँग्रेसचा उमेदवार झिशान सिद्दीकी यांनी बाजी मारली. त्याआधी 2015 मध्ये आमदार बाळा सावंत यांचं निधन झाल्याने, शिवसेनेने पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांना तिकीट दिलं होतं. त्यावेळी त्यांच्याविरोधात नारायण राणे होते. मात्र तृप्ती सावंत यांनी बाजी मारुन विधानसभेत प्रवेश केला होता.
‘मातोश्री’च्या अंगणातील जागा पटकावण्याच्या इरेने उतरलेल्या नारायण राणे यांना पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत जवळपास 20 हजारांच्या मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.
2015 मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळा सावंत यांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. शिवसेनेने प्रकाश सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांनाच उमेदवारी दिली. तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना हरवून जवळपास 20 हजारांच्या मताधिक्याने जिंकून आल्या होत्या. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या ‘वांद्रे पूर्व’ मतदारसंघात तिढा निर्माण झाला होता. अखेर विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलत शिवसेनेने उमेदवारीची माळ मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गळ्यात टाकली गेली. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं. राज्याच्या विविध भागातील बंडोबांना थंड करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘मातोश्री’च्या अंगणातील बंडखोरी रोखण्यात अपयशी ठरले होते. बाळा सावंत यांच्याशी असलेल्या घरच्या संबंधांची आठवण करुन देऊनही तृप्ती सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नव्हता.