राजकारण

शिवसेना पुन्हा अडचणीत; संजय राऊतांवर महिलेचे गंभीर आरोप, कोर्टात ४ मार्चला सुनावणी

मुंबई : मुंबईतील एका महिला मानसोपचार तज्ज्ञाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर काही गंभीर आरोप केल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. गेल्या सात वर्षांपासून संजय राऊत आपला छळ करत आहेत, असा गंभीर आरोप या महिलेने याचिकेत केलेला आहे. याप्रकरणी दोन रिट याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाल्या असून त्यावरील पहिली सुनावणी 4 मार्चला होणार आहे. ॲडव्होकेट आभा सिंह यांनी न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे हा अर्ज दाखल केला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या मागे पाळत ठेवण्यासाठी माणसं लावली होती, हेरगिरी करणं, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करणं, धमक्या देणे असे अनेक गंभीर आरोप महिलेने केले आहेत. 2013 पासून आपला छळ सुरू असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये एकदा आपल्यावर गंभीर शारीरिक हल्ला करण्यात आल्याचं महिलेने सांगितलं. त्याविषयी आपण मुंबई पोलिसात तक्रार देखील केली होती. मात्र त्यात एफआयआर दाखल केल्यानंतरही मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप या महिलेने केला आहे. संजय राऊत यांच्या राजकीय वजनामुळेच दबावाखाली येऊन मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही असा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आलेला आहे.

या याचिकेमध्ये मुंबई पोलिसांना देखील प्रतिवादी करण्यात आलेलं आहे. या सगळ्या गोष्टींविषयी आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दाद मागितली पण राऊत हे त्यांच्याच पक्षाचे असल्यामुळे याची कोणतीही दखल मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली नाही असे देखील या याचिकेत संबंधित महिलेने म्हटले आहे. या सगळ्यामुळे आपण राष्ट्रीय महिला आयोगाकडे देखील तक्रार केली. आयोगानं नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतू बीकेसीच्या पोलीस उपायुक्तांनी अजूनही त्याची दखल घेतलेली नाही, असं या याचिकेत म्हणण्यात आलेलं आहे. या पोलीस उपआयुक्तांनाही या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button