ख्रिस मॉरिस आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू
चेन्नई : दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस मॉरिस याने आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम रचताना आतापर्यंतचा सर्वात महागड्या क्रिकेटपटूचा मान मिळवला. राजस्थान रॉयल्स संघाने मॉरिसला तब्बल १६ कोटी २५ लाख रुपयांची विक्रमी किंमत देऊन आपल्या संघात घेतले. याआधी आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडूचा विक्रम १६ कोटी रुपयांसह युवराज सिंगच्या नावावर होता. आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या (अनकॅप्ड) खेळाडूंमध्ये कृष्णप्पा गौतमने तब्बल ९.२५ कोटी रुपयांचा भाव घेत सर्वांचे लक्ष वेधले. चेन्नई सुपरकिंग्जने त्याला आपल्या ताफ्यात घेतले.
कोलकाताने हरभजन आणि करुण यांना अनुक्रमे २ कोटी आणि ५० लाख रुपयांमध्ये घेतले. सनरायझर्स हैदराबादने केदार जाधवला त्याच्या २ कोटी रुपयांच्या मूळ किंमतीमध्येच मिळवले. चेन्नई सुपरकिंग्जने ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ चेतेश्वर पुजाराला ५० लाख रुपयांमध्ये घेऊन सर्वांनाच धक्का दिला.
अर्जुन तेंडुलकर ‘मुंबईकर’
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला अखेर स्थान मिळाले. अर्जुनला मुंबई इंडियन्सने २० लाखांच्या मूळ किंमतीमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. विशेष म्हणजे, अर्जुनसाठी मुंबई इंडियन्सव्यतिरिक्त कोणत्याही संघाने बोली लावली नाही.