टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतली कोरोना लस
मुंबई : कोरोना लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्याला सोमवारी सुरूवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबरच देशभरातील लाखो ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त अशा लाखो लोकांनी विविध रुग्णालये व केंद्रात जाऊन लस घेतली. मंगळवारी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही कोरोना लस घेतली.
१ मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले होते. रवी शास्त्री यांनी मंगळवारी ही लस घेतली आणि त्यांनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यांनी लिहिलं की,”आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. या व्हायरसशी लढण्यात भारतातील वैद्यकिय कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले, त्यानं जगभरात देशाची मान आणखी उंचावली गेली. या सर्वांचे आभार मानतो.”