Top Newsस्पोर्ट्स

नंदू… माझा जीवाभावाचा मित्र

- दिलीप घुमरे, जिल्हा न्यायाधीश, संगमनेर

– दिलीप घुमरे, जिल्हा न्यायाधीश, संगमनेर

माझ्या बालपणीचा जिवलग मित्र नंदू… आम्ही एकमेकांवर बिनधास्त रागावतो. तो कधीच वेळेवर उपलब्ध नसतो, स्वत: फोन करत नाही आणि अनेकदा मी केलेला फोन उचलत नाही. काही अडचणी, ताण असेल तर कधीही मोकळेपणाने काही सांगणार नाही. आपला ताण कधीही चेहऱ्यावर, वागण्यात जाणवू देणार नाही. अशा प्रकारच्या माझ्या अनेक तक्रारी त्याच्याबाबत आहेत आणि मी हे त्याला सांगतही असतो.

खरे तर त्याची सकाळ सर्वसाधारण एखाद्या प्रथितयश वकिलांपमाणे दिवसभरातल्या प्रकरणांची तयारी करण्यात जाते. मग दिवसभर कोर्टासमोर पक्षकाराची बाजू पोटतिडकीने मांडण्यास तो सज्ज असतो. यातून स्वत:साठीचा किती वेळ तो काढतो हे सांगणे तसे कठीणच. कोर्ट कामातून निवांत झाला की, संध्याकाळी थोडावेळ स्वत:साठी ठेवावा अशी त्याने तयारी करावी तर पक्षकार घरी आलेले असतात… मग सुरू होते त्याचे विकतचे दुखणे अंगावर घेण्याची तयारी… खरे तर एक मित्र म्हणून त्याच्या या दैंनदिनीशी मी निगडीत आहे म्हणूनच हे अधिकारवाणीने सांगू शकतो.

नंदूकडे येणाऱ्या प्रत्येकाला नंदू आपल्यासाठी काही तरी करेल याचा रास्त विश्वास असतो. नंदूही त्यांचे गाऱ्हाणे अती गांभीर्याने ऐकतो आणि गांभीर्याने त्या प्रकरणांचे ड्राफ्टिंग आणि इतर कामात व्यस्त राहतो. हे सगळं करत असताना त्याला वेळेचे, भुकेचे भान असेलच असे नाही… त्याची कामे सुरु असताना अनेकदा मुलं जेवायला बोलवायला येऊन गेलेली असतात, बायकोचा एखादा कळून दुर्लक्ष केलेला मिस कॉल असतो, मग खरच पोटात कावळे कोकलायला लागलेले असतात… वेळ पहावी तर १० वाजलेले… त्यानंतर मग घरी जाऊन पाहावं तर त्याची आई वाट पाहत असते… बायको-पोरं वाट पाहून गाढ झोपी गेलेली असतात. पण लेकानं दोन घास खाल्ल्याशिवाय आई झोपणार नाही हा निसर्गनियम… स्वयंपाक पुन्हा गरम करून आई सोबत दिवसभराच्या गमती जमती सांगत, कधी त्यांचे अनुभव ऐकत जेवण होतं… होतं कसलं ढकललं जातं बस्स… त्यानंतर मग माझ्यासारख्या मित्रांच्या फोनला रिप्लाय देण्याचे काम आवर्जून करून हा माझा मैत्र झोपी जातो.

एकदा मी त्याच्या घरी असताना एक पक्षकार दारात आला. थोडा बावरलेला. नंदू त्याला या म्हणाल्यावरही तो घरात येण्यास घाबरतो. दबकत आत येतो. कुणी पाठवलंय सांगत खाली काम चालवलेल्या वकीलसाहेबांचं पत्र काढून हातात ठेवतो. चुरगळलेल्या, मळलेल्या पत्राचे भाग सरळ करत ते नंदू वाचतो. त्यात थोडक्यात प्रकरणाची हकिकत लिहिलेली असते आणि खाली तळटीप… पक्षकार अतिशय गरीब आहेत सांभाळून घ्या.

आम्ही वर पाहतो, तर तो कागदपत्राऐवजी पिशवीत आणलेल्या कैºया आणि कांदे दाखवतो (कारण वकील कदाचित पैसे नाही तर घालवून देईल, अशी भीती असावी). त्याची अगतिकता पाहून नंदूच्याही डोळ्यात पाणी येतं… नंदू म्हणतो, ‘दादा ते ठेव बाजूला, कागद दाखव.’ मग आधीचं सुरु असलेलं सगळं काम बाजूला ठेऊन त्याचे काम हातात घेतो. कारण त्या मेहनतीच्या घामाच्या कैऱ्यांची चव आणि किंमत नंदूसाठी कैक हजार रुपयांपेक्षा जास्त असते… अशा अनेक कारणांनी मी त्याला जीवाभावाचा मैत्र मानतो…

कोणी लक्षात घेत नाही की, नंदू एका बाजूला न्यायिक व्यवस्थेशी बांधिलकी राखून संघर्षास सिद्ध असतो तर, दुसऱ्या बाजूला क्रिकेटवर मनस्वी प्रेम करणारा खेळाडूही त्याला आपल्यातल्या वकिलामध्ये सांभाळायचा असतो. यातून निर्माण होणारी प्रसंगी जीवघेणी सर्कस नंदू सहन करत असतो.

एक काम पूर्ण करण्यासाठी सतराशे साठ कागदपत्रांची लक्षपूर्वक पूर्तता करावी लागते, जे अनेकदा अशिल वेळेवर व्यवस्थित देत नसतात. एक काम झाले की दुसरे उभेच असते. मग तिसरे-चौथे अशी भल्या मोठ्या कामांची रांग नंदूकडे सातत्याने असते… त्याचा त्याला कधीही कंटाळा नाही.

नंदूलादेखील स्वत:चा संसार आहेच की… तुमच्या सारख्याच इतर जबाबदाऱ्या आहेत…. तोही मनुष्यच आहे… त्याच्यावरही असंख्य जबाबदाऱ्या आणि अपेक्षांचे ओझे असते.. २४ तासांत येणाऱ्या असंख्य फोनमधून त्याला स्वत:च्या मुला-बाळांना, आई – बायकोला जेवलात का रे…? असा फोन करायला देखील वेळ मिळणे अवघड होते… आपल्या कुटुंबावर, व्यवसायावर आणि आपल्या आवडीसाठी जोडलेल्या प्रत्येकावर मनापासून प्रेम करणाऱ्या, माणसे जपणाºया अशा या माझ्या मित्राला, नंदूला त्याच्या सर्वच सहकारी, मित्रांनी आपुलकीने समजून घ्यावे… हीच त्याच्याप्रती सदिच्छा…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button