Uncategorized

अमरावतीमध्ये आठवडाभरासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा

अमरावती : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता अमरावतीत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असताना राज्यात अनलॉकनंतर पहिला लॉकडाऊन हा अमरावतीत जाहीर करण्यात आला आहे. अमरावतीत सोमवार संध्याकाळी ८ वाजल्यापासून अमरावती शहर, अचलपूर शहरात पुढील आठवडाभर कडक लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी दुपारी केली आहे.

अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे. “सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अमरावतीकरांनी याचं पालन करावं. आम्हाला आता नाईलाजास्तव फक्त जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू ठेवावी लागणार आहे. इतर सारंकाही पूर्णपणे बंद असणार आहे. तसेच शहरातील बाजार हे गाईडलाइन्सनुसारच सुरू राहतील”, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

अमरावतीत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी यशोमती ठाकूर यांनी आज एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीआधीच ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, बैठकीआधी यशोमती ठाकरू यांनी अमरावती शहरात फिरून व्यवस्थेचा आढावा देखील घेतला. वाढत असलेली रुग्णसंख्या ही शहराच्या आरोग्याच्यादृष्टीनं अतिशय चिंताजनक असल्याचं ट्विट त्यांनी केलं होतं. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लवकरच आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील असं ठाकूर यांनी म्हटलं होतं. त्यानुसार बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत यशोमती ठाकूर यांनी पुढील आठवडाभरासाठी अमरावतीत संपूर्णपणे लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, राज्यात अनलॉकनंतर हा पहिलाच लॉकडाऊन असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button