आज जागतिक आरोग्य दिन सर्वत्र माफक प्रमाणात साजरा करण्यात आला.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या भितीचे सावट या दिनावर होते.त्यामुळे सर्वत्र उत्साहाचा अभाव होता.आज मानवजाती समोर जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे.लोकसंख्या नियंत्रण व प्रभावी आरोग्य यंत्रणा,या दोन महत्वाच्या प्रश्नाकडे जगभरातील सर्वच देशांनी गांभीर्याने पाहिले नाही.त्याचे परिणाम आता जीवसृष्टीवर जाणवू लागले आहेत.
दरवर्षी ७ एप्रिल,हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येत असतो.७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक स्तरावरील आरोग्य समस्या व त्यावर उपाययोजना,या महत्वाच्या विषयावर विचारविनिमय करण्यासाठी जागतिक आरोग्य संमेलन पार पडले.या संमेलनात मानवासमोर असलेल्या आरोग्य समस्या सर्वांनी एकजुटीने सोडवाव्यात यावर एकमत झाले.त्यानंतर ७ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.जगातील अनेक विकसित देशाची आर्थिक कुवत होती,त्या देशांनी गेल्या ७० वर्षात विविध रोगाचा यशस्वीपणे मुकाबला केला.प्लेग,पोलियो,क्षय,
एड्स व अन्य रोगांचा समावेश होता.परंतु अविकसित देशांना ते शक्य झाले नाही,परिणामतः या देशांना प्रचंड मनुष्यहानी सहन करावी लागली.वाढती लोकसंख्या,त्यावर नियंत्रण आणण्याकडे झालेले दुर्लक्ष व वाढते प्रदूषण इ.कारणे आरोग्याच्या समस्या वाढवण्यास कारणीभूत ठरल्या.बर्ड फ्लू व स्वाइन फ्लू या रोगानंतर आता कोविड १९ ने जगभरात धुमाकूळ घातला आहे.या जीवघेण्या विषाणूचा जगातील सारे देश एकत्रितपणे मुकाबला करत आहोत,वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर आजही आपण ही लढाई लढतच आहोत.या लढाईमध्ये लढत असताना,जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेबाबत अनेक देश नाराज झाले आहेत.कोविड १९ च्या बाबत त्यांनी स्विकारलेली भूमिका भेदभाव करणारी असल्याचे स्पष्ट करत अमेरीकेने त्यांची आर्थिक मदत थांबवली.संघटना चीनच्या कच्छपी लागल्याचा आरोप करत ट्रम्प प्रशासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतला होता.त्यामुळे आता अमेरिकेचा प्रतिस्पर्धी असलेल्या चीनने संघटनेला भरघोस आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे.
मानवजाती समोर असलेल्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी एकत्र आलेल्या विकसित तसेच आर्थिकदृष्टया सक्षम असलेल्या देशामध्ये बेबनाव निर्माण झाल्यामुळे जागतिक आरोग्य दिन,हा दीन अवस्थेत आला आहे. हा दिवस साजरा करणे,ही केवळ औपचारीकता ठरली आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा आपण उत्साहात साजरा करू शकलो नाही.