
ज्यांची धारदार शैली आणि शब्दांचे सामर्थ्य अफाट आहे, अशा पत्रकारांपासून सगळे जग वचकून असले तरी ते ज्या वृत्तपत्रात काम करतात त्या मालक, व्यवस्थापनाने त्याची शेळी करून ठेवलेली असते. *शब्द कितीही स्फोटक, धारदार असले तरी त्याने पोट भरले जात नाही, कुटुंबाच्या गरजा भागत नाही याची वारंवार त्याला जाणीव करून दिली की बाणेदार पत्रकार कंबर तुटेपर्यंत मालकापुढे वाकायला लागतात हे आजच्या पत्रकार विश्वातले वास्तव आहे*. पुढारी, पत्रकार आणि सर्व क्षेत्रातील बेईमानांची नवी आघाडी गेल्या काही वर्षात राज्यात तयार झाली आहे. एकमेकांना सांभाळून घेताना लोकांचे प्रश्न सडले, कुजले तरी त्यांना फारशी फिकीर नसते. असंख्य पुढार्यांचे याच संबंधातून पत्रकार जवळचे सल्लागार बनले आहेत. पुढार्यांना लोकहिताचे कमी अन् बेईमानीचे सल्ले देऊन त्याचे विविध आघाड्यांवर व्यवस्थापन करणार्या पत्रकारांचा समूह आता प्रत्येक जिल्ह्यात तयार झाला आहे.
पूर्वीच्या काळी संपादकाला उद्या कुण्या बेईमान प्रवृत्तीला उघडे पाडायचे याचे वेध लागत असत. अलीकडे संध्याकाळ झाली की संपादकांना बसून चर्चा करणार्या प्रायोजकाचे वेध लागतात. कुणीच मिळाला नाही तर संपादक विभागातल्या कुणाचा तरी बळी घेतला जातो. अनेक वृत्तपत्रातल्या संपादकीय सहकार्यांनी अशा तळीराम संपादकांची धास्ती घेतली आहे.
रात्री यथेच्छ दारूकाम करून दुपारी चारला उठून कार्यालयात जाणार्या अशा लोकांचे व्यसनाधीनता आणि नैतिकतेवर प्रवचन देणारे लेख दुसर्या दिवशी वाचकांना सहन करावे लागतात. पत्रकारितेच्या आकर्षणापोटी अनेक तरुणी मोठ्या वृत्तपत्रात उमेदवारी करतात. त्यातल्या देखण्या तरुणींना आपल्या जाळ्यात ओढणारे महाभाग पण या क्षेत्रात कमी नाहीत. रिपोर्टर, उपसंपादक वा डेस्कवर विविध विभाग सांभाळणार्या मुलींना संपादकांच्या कक्षात अनेकदा जावे लागते. अशावेळी काही चावट संपादक, कामाचे सोडून तिच्या खासगी जीवनात डोकायला लागतात. “तुझ्याकडून मला खूप अपेक्षा आहेत.” असे द्वैअर्थी संवाद मुलींसोबत केले जातात. त्यांना पदोन्नती वा कायम करून घेण्याची आमिषे दाखवून शोषण केल्याची असंख्य उदाहरणे या क्षेत्रात घडली आहेत. पुरुष कर्मचार्यांचे मानसिक, आर्थिक आणि स्त्रियांचे शारीरिक शोषण करणारे अनेक महाभाग विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून या क्षेत्रात मिरवत आहेत.
अर्थात या क्षेत्रात आता सगळेच संपले, असे नाही. मूठभर लोक या व्यवसायाशी अतिशय प्रामाणिक आहेत. पत्रकारिता आणि माणुसकीची सगळी तत्त्व सांभाळून काम करणार्या अशा मोजक्या लोकांच्या बळावर या क्षेत्राविषयीचा लोकांचा विश्वास कायम आहे.
तत्कालीन केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर ‘मीटू’ प्रकरण शेकल्यावर या क्षेत्रातल्या अनेक स्त्रिया पुढे येतील असे वाटले होते, मात्र अपवाद वगळता तसे काही झाले नाही. लैंगिक संबंध हा प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा भाग असला तरी या क्षेत्रात घडणार्या प्रकरणांना स्वातंत्र्याचे लेबल लावता येणार नाही. वर्षभर संपादकाची मर्जी सांभाळली नाही तर आपला नोकरी करार नव्या वर्षात असेल की नाही याचे दडपण घेऊन जगणारे पत्रकार खूप आहेत. ती तरुणी असेल तर तिच्यासाठी मालक वा संपादकाच्या मर्जीचा अर्थ वेगळा समजून सांगण्याची गरज नाही. मुंबई, पुण्यात अपवाद वगळता सर्वच माध्यमात हे चालत असेल तर याविरुद्ध दाद कुणाकडे मागावी? कुंपणच शेत खातेय, अशा म्हणी बातमीत वापरताना आपणच शेत आणि शेण दोन्ही सोबत खातोय याचे भान सोडलेल्या असल्या बोरूबहाद्दरांनी जगाला ज्ञानाचे डोज पाजावेत हे मोठे नवल आहे.
जे घडतेय ते निमूटपणे नोकरीची काळजी करीत सहन करायचे. हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी अवस्था या क्षेत्रात प्रामाणिक आणि धडपड्या पत्रकारांची बनली आहे. एखाद्या वृत्तपत्रात सहन केलेले भयंकर प्रकार नोकरी सोडल्यावर सांगायला सुरुवात केली तर त्याचे व्यवसाय बंधू त्याला वेड्यात काढतात. इतरत्र नोकरी मिळणार नसल्याची तंबी दिली जाते. पोटासाठी काळ्या पाण्याची शिक्षा वर्षानुवर्ष भोगणार्या पत्रकारांना मालकांचे आदेश झाले की स्वातंत्र्यावर रकाने भरून मजकूर खरडावा लागतो, हे केवळ इथेच घडते.



