राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार?
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलच तापलं आहे. सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या खंडणीचा थेट आरोप केला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारची देशभरात नाचक्की झाली आहे. भाजपने याच मुद्द्यावरून महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्यासह गुजरातमधील अहमदाबाद येथे शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अशी भेट झालीच नसल्याचे सांगत या गुप्त भेटीचा इन्कार केला आहे. तर दुसरीकडे अमित शहा यांनी पवारांसोबत झालेली भेट यावर बोलताना सर्व गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात असे सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्याचवेळी शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीच्या तपशिलाच्या नोंदी ठेवू नका असे आदेश अहमदाबाद पोलिसांना मिळाल्याचे ऐकायला मिळते. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार आणि भाजप सोबत जाणार अशा चर्चेला उधाण आलं आहे.
अहमदाबादमध्ये एका उद्योगपतीच्या घरातील डिनर डिप्लोमसी ही सध्या राजकारणात चांगलीच तापू लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत उद्योगपतीच्या घरीच अमित शहांना जेवणासाठी भेटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर डिनर डिप्लोमसीवर मात्र अनेक प्रकारच्या तर्क वितर्कांनी जोर धरला आहे. महत्वाच म्हणजे या भेटीबाबतची अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. अहमबदाबाद पोलिसांनाही या भेटी दरम्यानच्या केंद्रीय गृहमंत्री यांच्या मुव्हमेंटची ठेवू नका असेही आदेश देण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे उद्योगपतीच्या घरी पवार अमित शहा येण्याच्या पाऊण तास आधीच पोहोचले होते.
जाणकारांच्या मते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर शरद पवार हेच महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. जनतेशी ते बांधिल आहेत. पवार हे राजकारण कोळून प्यायलेले व्यक्तिमत्व आहे. वेळेप्रमाणे राजकीय समीकरणे बदलण्यात त्यांचा हात देशातला कोणताही नेता धरू शकत नाही. त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होतो. यामुळे देशमुख यांच्यावरील १०० कोटी खंडणीच्या आरोपानंतर जर पवार यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला तर त्यामुळे राज्यातीलच नाही तर देशातील त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभारले जाण्याचीच शक्यता अधिक आहे. यामुळे इतक्यात तरी ठाकरे सरकारमधून बाहेर पडणे पवार यांना कठीण आहे.
पोलिसांच्या बदल्या आणि बढत्यांमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि गृहमंत्री अनिल देशमुखांनी मुंबई पोलिसांना दिलेले दरमहा १०० कोटींचे हप्ता वसुलीचे टार्गेट यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नाचक्की झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी क्रॉंगेसमधूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काही निर्णयांमुळे नव्याने वाद निर्माण झाल्याचे दिसते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना सादर केलेल्या अहवालातून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. तसेच सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेच्या डायरीतूनही अनिल देशमुखांच्या कार्यालयातील काही जणांची नावे उघड झाली आहेत.
दुसरीकडे आतापर्यंत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना प्रसिद्ध आहे. गुरु शिष्याचे हे नाते असल्याचे आवूर्जून सांगितले जाते . पण शहा आणि पवार यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे यापूर्वी कधीही दिसले नाही. उलट शरद पवार य़ांनी जाहीर व खासगीत अमित शहा यांच्या कार्यशैलीवर कठोर टीका केली आहे. असे असतना पवार आणि पटेल खास विमानाने अहमदाबादला जातात याचा अर्थ काय असा सवाल आता शिवसेनेतून दबक्या आवाजात विचारला जात आहे. त्यामुळे या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे सांगत हे वृत्त फेटाळण्यात आले. तर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही या भेटीबाबतचे वृत्त फेटाळताना अफवांची धुळवड थांबवा असे आवाहन केले. तर महाराष्ट्र भाजपकडूनही या प्रकरणावर प्रतिक्रिया येतानाच पक्षश्रेष्ठी सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया देण्यात आली. तर दुसरीकडे कॉंग्रेसने मात्र या भेटीचा तपशील हा सार्वजनिक होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे.