राजकारण

महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन अपरिहार्य; वडेट्टीवार मुख्यमंत्र्यांना विनंती करणार

मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोणत्याच उपायाला यश येताना दिसत नाही. परिणामी लोकांचे जीव वाचवण्यासाठी काही दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे सूतोवाच विजय वडेट्टीवार यांनी केले. परिस्थिती बिकट असल्यामुळे महाराष्ट्रात भविष्यात पूर्णतः लॉकडाऊन लावण्याची विनंती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आज करणार आहे, असे
वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, ज्याप्रमाणे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, त्यामुळे पुढील १० दिवसांमध्ये Active रुग्णांची संख्या १० लाख असण्याची शक्यता आहे. यामुळे अशा परिस्थिती भविष्यात पूर्णतः लॉकडाऊन करावा लागेल. रेल्वेवर निर्बंध आणावे लागतील, गर्दी कुठे होणार नाही हे पाहावे लागेल. ही संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी किती उपाययोजना केल्यातरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्स कमी पडतील. त्यामुळे हे आणणार कुठून? जे साडे पाच हजार डॉक्टर अंतिम परीक्षा पास देतील. त्यांना आम्ही सेवेत आणणार आहोत. तरी सुद्धा हे देखील कमी पडतील. म्हणून वीकेंडचा लॉकडाऊन नाही तर ३ आठवड्याचा कडक लॉकडाऊन महाराष्ट्रात लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार आहे. कारण आता आपण निरपराध लोकांचे प्राण वाचवू शकत नाही. कोरोनाचा अनोळखी स्प्रेड पसरला आहे. अशा परिस्थितीत पूर्णतः लॉकडाऊन होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आज मी याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. ही विनंती काँग्रेसकडून नसून आपती व्यवस्थापन खात्याचा मंत्री म्हणून मी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे.

अशातच केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे. लशींचा तुटवडा निर्माण होऊनही महाराष्ट्राला पुरवठा केला जात नाही. याउलट गुजरातला जास्त लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन अपरिहार्य आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच विनंती करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील लोकल ट्रेनच्या प्रवासावर पुन्हा एकदा निर्बंध आणण्याची शक्यता बोलून दाखविली. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणती नवी घोषणा करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आगामी 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 10 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे. त्यामुळे विरोधकांनी यावरुन राजकारण करु नये. गेल्या महिन्यात एमपीएससीची परीक्षा रद्द झाली तेव्हा भाजपचे नेते रस्त्यावर उतरले. आतादेखील भाजपकडून व्यापाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावले जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

अंतिम वर्षाच्या डॉक्टर्सना सेवेत घेणार

कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे लॉकडाऊन आणि गर्दी टाळण्याची गरज आहे. अन्यथा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडेल. त्यामुळे आम्ही अंतिम वर्षाच्या डॉक्टर्सना सेवेत सामावून घेत आहोत. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनाही आम्ही सेवेत सामावून घेतले आहे. या माध्यमातून 5500 हजार डॉक्टर्स उपलब्ध होत आहेत. कोरोनाचा वाढता आकडा पाहता हे मनुष्यबळही अपुरे पडेल. त्यामुळे निष्पाप लोकांचे जीव वाचवण्यासाठी तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button