राजकारण

दिवाकर रावते आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर का भडकले?

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते यांनी मराठीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलंय. सभागृहात कामकाज सुरू असताना इंग्रजी शब्दांच्या केल्या जाणाऱ्या वापराला दिवाकर रावते यांच्याकडून जोरदार विरोध झाला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेक कानपिचक्या दिल्या. मराठी भाषा आणि मराठी विद्यापीठ मुद्द्यावर रावतेंनी सरकारला धारेवर धरत स्वपक्ष शिवसेनेलाही घरचा आहेर दिला. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे होत असल्याचं नमूद करत ते विधान परिषदेत चांगलेच भडकले.

दिवाकर रावते म्हणाले, “सभागृहात कामकाज सुरू असताना इंग्रजी शब्दांचा वापर चुकीचा आहे. मराठी शब्द संग्रह असताना इंग्रजीचा वापर करणं म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देखील अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल एक शब्दही व्यक्त करण्यात आला नाही. याबद्दल मी खंत व्यक्त करतो.”

“मराठी ही राजभाषा असून त्याचा वापर प्रशासकीय कामकाजात वापरायला हवा. मुंबईतील बॉम्बे क्लबचं नाव आजही तेच आहे, बदललं जात नाही. मुंबईत सर्व भाषा आणि परप्रांतीयांचे भवन बांधले आहेत, पण मराठीचे भवन का नाही? शिवसेनेला मराठीबाबत एक शब्द उच्चरता आला नाही हे दुर्दैव आहे,” अशीही संतप्त भावना दिवाकर रावते यांनी व्यक्त केली.

“संभाजी नगर नाही बोलायचं कारण हे कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये नाही असं बोलल्यावर शांत बसायचं. मराठी विद्यापीठाबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही. याबाबत मला बोलावं लागत आहे हे वाईट आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा, मात्र अर्थसंकल्पात मराठीसाठी काहीच नाही. मी मेल्यावर साहेबांना भेटलो आणि वर गेल्यावर मला त्यांनी विचारलं की मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ?” असा सवाल दिवाकर रावते यांनी विचारलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button