भाजपकडून ओबीसींचा विश्वासघात : नाना पटोले

नागपूर: भाजपने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला गृहीत धरु नये, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता. आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. सरसंघचालकांचा आदेश प्रचारकाला मानावा लागतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.
नागपुरात ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी जनगणनेचे आकडे जाहीर करण्याची मागणी केली. तसेच भविष्यात भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरु नये, असे त्यांनी सांगितले.
आरक्षणाबाबत भाजपची विचारधारा वेगळीच !
भाजपची आरक्षणविरोधात वेगळी विचारधारा आहे. एक वेगळा दुतोंडी चेहरा असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
मंडल आयोग आल्यानंतर भाजप त्याला विरोध करत होती ही सत्य परिस्थिती आहे. आजच्या घडीला मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल काही लोकांना ते स्वतः कोर्टात पाठवत आहेत आणि याप्रकारची परिस्थिती राज्यात निर्माण करत आहेत. कोर्टात एखादा निर्णय रद्द झाल्यावर राज्य सरकारच्या विरोधात वेगळी भाषा बोलायला लागतात ही भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.




