रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. वादग्रस्त विधानामुळे झालेली अटक आणि त्यानंतर जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी यात्रेचा पुनश्च शुभारंभ केला आहे. यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला त्यांनी रत्नागिरीत सुरुवात केली आहे. पहिल्या कार्यक्रमात राणे यांनी शिवसेनेबद्दल चकार शब्द काढला नाही. मात्र दुसऱ्या सभेत त्यांनी शिवसेनेवर जहरी टीका करताना मातोश्रीवरील सर्व प्रकरणे उघड करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं पोराला. काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका, असा सज्जड दमही राणे यांनी दिला.
त्या वेळेला मी तिथे असतो तर आवाज माझाच असता..असतो तर ना.. जसं एका दरोडेखोराला अटक करतात, तसं केंद्रीय मंत्र्याला अटक करायला दोनशे अडीचशे पोलीस, वा काय पराक्रम आहे? महाराष्ट्रातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न घ्या आजही त्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. पूरस्थिती घ्या, चिपळूण घ्या महाड घ्या, अजून कुणालाही पैसे मिळालेले नाही, असं टीकास्त्र राणे यांनी सोडलं.
वरुण सरदेसाई आता आला तर माघारी जाणार नाही !
दरम्यान, रत्नागिरीत बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर हल्लाबोल केला. वरुण सरदेसाई यांनी नारायण राणेंच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं होतं. याबाबत नारायण राणे म्हणाले, आमच्या घरासमोर वरुण सरदेसाई आला होता. आमच्या घरावर हल्ला करतो त्याला अटक होत नाही, तो नातलग आहे. काय आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वट. कुठल्याही नेत्याला जो पोलीस बंदोबस्त नाही तेवढा त्याला आहे. त्याने मार खाल्ला. एवढे पोलीस असून तिथल्या मुलांनी एव्हढा चोपला ना.. आता परत आला तर माघारी नाही जाणार, आमच्या घरावर कोणी येईल, आम्ही नाही सोडणार. आणि तो वरुण येऊ देच, असा इशारा राणे यांनी दिला.
नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. कसली भाषणं करता. मी मग सोडणार नाही. आता जुन्या गोष्टी काढणार, काढा ना. दोन वर्षे झाली अजूनही शोधताहेत. नाही मिळालं. आम्हालाही जुन्या गोष्टी माहिती आहेत. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.